प्रभाग क्रमांक १७

पाच वर्षांच्या कार्यकाळात स्थानिक लोकप्रतिनिधींनी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला असला तरी दूरदृष्टी ठेवून एखादा कठीण विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न फारच कमी दिसून येतात. कारण कुठल्याही कुटुंबावर दूरगामी परिणाम करणाऱ्या समस्यांवर दूरदृष्टी ठेवून नगरसेवकांनी काम न केल्याचा ठपका नागरिकांनी ठेवला आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील बाजारात कचऱ्याचे साम्राज्य असून ‘ग्रीन जीम’चे साहित्य तुटलेले आहे.

या भागाचे प्रतिनिधीत्व नगरसेवक किशोर गजभिये आणि सत्यभामा रमेश लोखंडे करीत आहेत.  साधारणत: या भागातील नागरिकांची दैनंदिन कामे सुरळीत होतील, एवढय़ा सुविधा या भागात आहेत. डांबरी रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, गरज पडल्यास टँकर, मलवाहिनी, समाज मंदिरे, उद्यानात लावलेले ‘ग्रीन जीम’ची कामे प्रभागात झालेली आहेत. मात्र, जेव्हा सिटी सव्‍‌र्हे, नझुल, सात-बाराचा उतारा, एनआयटी, टॅक्स असे मुद्दे निघतात तेव्हा नागरिकांचा पारा चढतो. याबाबतीत विद्यमान नगरसेवकांचा प्रभाव काहीच नसून नागरिकांना फारच त्रास सहन करावा लागतो. नगरसेवक स्वत:चे वजन आणि प्रभाव जोपर्यंत एनआयटी किंवा संबंधित विभागांवर टाकणार नाही.

नाल्यात प्रचंड घाण आहे. मात्र, याबाबत नागरिक स्वत:लाच दोषी धरतात. ‘ग्रीन जीम’ची संकल्पना आदिवासी कॉलनी, नवीन बाबुलखेडा या भागात दिसून येतात. मात्र, आदिवासी कॉलनीजवळ्याच्या ‘ग्रीन जीम’चे साहित्य निकृष्ट दर्जाचे असून दुसऱ्याच दिवशी त्यातील एक व्यायामाचा प्रकार तुटून पडला. रामबागेत अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. दुसरे म्हणजे नगरसेवक कार्यक्रमातील भाषणांमध्ये खूप बोलत असले तरी ते बजेटवर बोलून भागातील वाचनालये, शाळा, धर्मादाय दवाखाने यांच्यासाठी पैसा खेचून आणत नसल्याची खंतही काही नागरिकांनी व्यक्त केली. रेशीमबाग, सोमवारी क्वार्टर या भागात नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर आहे. मात्र बुधवारी बाजाराजवळच्या कुटुंबांना भोयर यांच्यापेक्षा रघुजीनगरचे नगरसेवक सतीश होले यांचाच आधार आहे. बुधवारी बाजारच्या कडेला असलेल्या दहा-बारा घरांचे मतदान नाही मिळाले तरी काही फरक पडत नाही, असे भोयर म्हणतात. त्यामुळे गेल्या निवडणुकीत १०-१२ घरांनी मतदानच केले नसल्याच्या नागरिकांच्या आठवणी ताज्या झाल्या.

प्रभागातील समस्या

  • सोमवारी क्वार्टर परिसरात बाजारामुळे नागरिक त्रस्त.
  • नगरसेवक लक्ष देत नाहीत.
  • ग्रीन जीममध्ये लावलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे.
  • जाटतरोडी, रामबागेत झोपडपट्टीची समस्या कायम.
  • चंद्रमणीनगरातील काही भाग अनधिकृत, विकास मात्र झालेला.

प्रभाग १७ मधील वस्त्या

वंजारीनगर, तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, रामबाग, रामबाग हाऊसिंग बोर्ड कॉलनी, आयसोलेशन हॉस्पिटल, आशीर्वाद सिनेमागृह, उंटखाना, चंद्रमणीनगर, श्रमजीवीनगर, विश्वकर्मा नगरचा काही भाग, अजनी पोलीस ठाणे, अजनी पोलीस प्रशिक्षण केंद्र, गांधीसागर तलाव, गणेशपेठ, रामन विज्ञान केंद्र, महात्मा फुले मार्केट परिसर, शनिवारी, गुजरवाडी,  टिंबर मार्केट, बारा सिग्नल, जाटतरोडी, आनंदम सिटी, एस.टी. बसस्थानक परिसर, मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, रेल्वे कॉलनी, इंदिरानगर, टी.बी. वार्ड हॉस्पिटल व क्वाटर्स आणि राजाबाक्षा.

आता कोणते विकास शुल्क भरायचे?

चंद्रमणीनगर आणि विश्वकर्मानगर या भागात विकासाची अनेक कामे झाली आहेत. काही ठिकाणी झोपडपट्टी किंवा अनाधिकृत लेआऊट असले तरी लोकांच्या नावाने घरे आहेत आणि विक्रीपत्रेही झाली आहेत. अकृषी जमीन आणि आरएल प्रमाणपत्र हा भाग स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारित येतो. या दोन्ही गोष्टीसाठी विकास शुल्क भरावे लागते. या भागात विकास झालेला असताना आता कोणते विकास शुल्क भरायचे?

किशोर गजभिये, नगरसेवक

 

समस्या कायमच

गेल्या २५ वर्षांत ज्या समस्या आहेत, त्या जशाच्या तशा आहेत. रस्ते झाले ते तर सर्वत्रच झाले. तेही भाजपमुळे झाले. विद्यमान नगरसेवकांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कामे झालेली नाहीत. रामबाग किंवा जाटतरोडीतील मलवाहिन्या तुंबलेल्या आहेत. झोपडपट्टय़ांची कामे अद्यापही सोडवली गेली नाहीत.

नलिनी करांगळे, पराभूत उमेदवार

 

मलवाहिनी, विजेची समस्या

चंद्रमणीनगर आणि विश्वकर्मानगरच्या मधोमध नाला आहे. पावसाळ्यात नाल्याजवळच्या खोलगट घरांमध्ये पाणी शिरते.  आमची मलवाहिनी नाल्याला जोडून दिल्यास नाल्याचे पाणी ओसरल्यावर  ते नाल्यात जाईल. आमच्याकडे बुधवारी आणि इतर वेळीही वीज जाते. तशी नगरसेवक असलेल्या चंद्रमणीनगर भागात मात्र, थ्री फेज लाईट आहे. त्यांच्याकडे तेवढी जात नाही. कारण नगरसेवकाने त्या भागात डीपी बसवून घेतली.

सुरेंद्र भगत, विश्वकर्मानगर

 

कचऱ्याची दरुगधी

ज्या ठिकाणी बुधवारी बाजार भरतो त्याच्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या घरांना बाजाराचा प्रचंड त्रास होतो.  बुधवारी बाजार असले तरी तो रोज भरतो.  दुसऱ्या दिवशी भाजीवाले टाकावू भाजी तेथेच टाकून जात असल्याने सडलेल्या भाजीचा दरुगध, मच्छरांचा प्रादुर्भाव यामुळे आम्ही वर्षभर त्रस्त असतो. रस्ता बाराही महिने उखडलेला असतो.

रामदास पाटील, सोमवारी क्वार्टर