24 September 2020

News Flash

आकाश पाळण्यांना कुलूप, हजारोंची उपासमार!

मार्चपासून करोनाची साथ सुरू झाल्यानंतर सरकारने सर्व जत्रा आणि गर्दी होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातली.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात ठिकठिकाणी भरणाऱ्या जत्रेत जाऊन तेथे विविध  आकाशपाळणे आणि तत्सम प्रकारचे पाळणे लावून व्यवसाय करणाऱ्या शेकडो व्यावयासिकांचे करोनाच्या साथीमुळे  कंबरडेच मोडले आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून सरकारचे मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे.

महाराष्ट्रात १८ ते २० ठिकाणी मोठय़ा जत्रा भरतात. याशिवाय गणेशोत्सव, दुर्गोत्सव, उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टय़ा हा या व्यावसायिकांचा प्रमुख हंगाम असतो. महाराष्ट्रात एकूण १२० पाळणा व्यावसायिक आहेत. त्यापैकी ९० विदर्भात व यापैकी ४० नागपुरात आहेत. या व्यवसायाचे केंद्रच नागपूर आहे. जत्रेत जाऊन आनंद मेळावा (प्रदर्शन) आयोजित करणे त्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे पाळणे लावून अर्थार्जन करणे असे या व्यवसायाचे स्वरूप आहे. मार्चपासून करोनाची साथ सुरू झाल्यानंतर सरकारने सर्व जत्रा आणि गर्दी होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातली. त्यामुळे सर्व पाळणे सध्या कुलूपबंद आहेत. परिणामी या क्षेत्रातील व्यावसायिक, त्यांच्याकडे काम करणारे शेकडो कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबाची सध्या उपासमार सुरू असल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या संघटनेचे अध्यक्ष प्रसाद वैद्य यांनी सांगितले. उन्हाळ्याचा हंगाम बुडाला, अनेक यात्रा रद्द करण्यात आल्या. गणेशोत्सव होणार असला तरी कार्यक्रमांवर बंदी आहे. हा व्यवसाय सरकारच्या अधिकृत व्यवसायांमध्ये मोडत नाही. त्यामुळे सरकारकडूनही आमच्यासाठी काहीच सवलती जाहीर करण्यात आल्या नाही, याकडे वैद्य यांनी लक्ष वेधले.

*  पाच हजार कर्मचाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह

एका व्यावसायिकाकडे ३० ते ४० कर्मचारी असतात. एकूण १२० व्यावसायिक आहेत. त्यानुसार पाच हजारापर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या जाते. त्यात तिकीट खिडकी सांभाळणाऱ्यापासून पाळण्याची देखभाल दुरुस्ती, विविध स्टॉल सांभाळणारे,  सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. ‘मौत का कुवां’ लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिदू असतो. त्यात दुचाकीची कसरत दाखवणाऱ्या रायडरला महिन्याला ३० हजार रुपये दिले जातात.

* जत्रेची ठिकाणे

विदर्भात सालबर्डी, बहिरम (अमरावती), मरकडा (गडचिरोली), चंद्रपूरची महाकाली देवीची यात्रा, चिमूरची घोडा यात्रा, पश्चिम महाराष्ट्रात पंढरपूरमध्ये आषाढी व कार्तिकीची यात्रा, सोलापूरची सिद्धेश्वरची यात्रा, कोल्हापुरातील नवरात्र, मराठवाडय़ातील तुळजापूर, बीड, हिंगोली, लातूर आणि नाशिकमध्ये नवरात्रीची यात्रा याशिवाय नागपूरमध्ये ताजाबाग, दसऱ्याला दीनानाथ हायस्कूलमध्ये प्रदर्शनात पाळणे लावले जातात. याशिवाय उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत लागणाऱ्या मनोरंजन मेळाव्यात त्यांचा सहभाग असतो.

*  ५०० कोटींची उलाढाल ठप्प

पाळणे आणि मनोरंजनाच्या इतर साधनांचा व्यवसाय करणारा आनंद मेळा लावतात. एका मेळ्यात ४० ते ५० स्टॉल्स असतात. शिवाय खेळणे आणि पाळणे वेगळे. यांचे विविध प्रकार आहेत. त्यात आकाशपाळणा, ड्रॅगन ट्रेन, टोराटोरा, क्रॉसव्हिल, कोलंबस आदी. प्रत्येक यात्रे दरम्यान आनंद मेळ्यासाठी आयोजकांकडून निविदा काढल्या जातात. १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत त्याची किंमत असते. नागपुरात ताजाबाग उत्सवाची निविदा ही एक कोटीला गेली होती. एवढी रक्कम संबंधित संस्थेला देऊन व्यावसायिकांना त्यांची कमाई करायची असते.  यात्रेला जेवढी जास्त गर्दी तेवढे उत्पन्न अधिक. वर्षभरात या क्षेत्रात पाचशे कोटींची उलाढाल होते. ती यंदा ठप्प झाली आहे, असे वैद्य यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:02 am

Web Title: lock the skyrocketing starve thousands due to lockdown abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 बिगर नेट, सेट प्राध्यापकांना आर्थिक लाभ
2 Coronavirus : लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांचे उपचारासाठी हाल!
3 लोकजागर : टाळे नव्हे ‘झापड’बंदी!
Just Now!
X