प्रेयसीवर चोरीच्या रकमेची उधळपट्टी

नागपूरच्या हुडकेश्वर, बेलतरोडी, नंदनवन भागात गेल्या आठ महिन्यात ४० घरफोडी करणाऱ्या खुशाल पंढरी बारापात्रे (३०), रा. बुटीबोरी या आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आरोपी चोरीची रक्कम आपल्या प्रेयसीवर मोठय़ा प्रमाणात उडवत होता. यांच्याकडून इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिमंडळ क्रमांक ४ चे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोपी खुशाल बारापात्रे दिवसभर दुचाकीवरून फिरून ज्या घराला कुलूप आहे त्याला लक्ष्य करायचा. दिवसात किमान एक तरी चोरी तो करायचा. तो  फेब्रुवारी २०१७ मध्ये घरफोडीच्या एका गुन्ह्यत शिक्षा भोगून बाहेर आला होता. तो दिवसा चोरी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो घरफोडीनंतर बुटीबोरीतील त्याचा मित्र आणि सोनार चेतनकुमार अश्विनी सोनी (४३) यांच्याकडे चोरीचे दागिने गहाण ठेवायचा. मिळालेले पैसे तो प्रेयसीसह इतर कामाकरिता खर्च करायचा. एका नागरिकाच्या तक्रारीवरून सापळा रचून पोलिसांनी खुशाल बारापात्रेला पकडले. आरोपीने दिलेल्या माहितीवरून सोनार चेतनकुमारच्या घरी पोलिसांनी छापा मारला. याप्रसंगी चोरीचा मुद्देमाल ३५ पिशव्यांमध्ये आढळला. हा सर्व सहा लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. एकटाच चोरी करणारा हा आरोपी अशिक्षित असल्यामुळे त्याला मोबाईल योग्यरित्या  हाताळता येत नाही. सोबत त्याला पत्ताही सांगता येत नसल्याचे, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी सांगितले.

होमगार्डची मदत

गेल्या ऑक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या दरम्यान ३५ ते ४० घरफोडय़ा झाल्यामुळे नागरिक भयग्रस्त होते. तीनही पोलीस ठाण्याचे पोलीस चोरटय़ाच्या मागावर होते. इतकेच नाही तर पहिल्यांदाच पोलिसांनी १२० होमगार्ड चोरटय़ाचा माग घेण्याच्या कामी लावल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.