वर्षभरात ३६ हजार ८५० जणांना बाधा

राम भाकरे, लोकसत्ता

नागपूर : वर्षभरापासून शहरात करोना महामारीने कहर केला आहे. शहरात गेल्या दोन महिन्यापासून बाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. मार्च २०२० पासून ते मार्च २०२१ या वर्षभरात शहरात ३१ ते ४० या वयोगटात सर्वाधिक ३६ हजार ८५० बाधित आढळले तर सर्वात कमी ९१ ते १०० या वयोगटात  १९९ बाधित आहे. शतक पार केलेल्या करोनाग्रस्तांची संख्या १२ आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात पाचपट बाधित वाढले आहे.

शहरात मार्च २०१९ मध्ये करोनाबाधित आढळले. यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये सर्वाधिक म्हणजे ३७ हजार १४१ रुग्ण तर आता मार्च २०२१ मध्ये ५९ हजार ८३२ रुग्ण आढळले.  करोना नियंत्रणासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासन उपाययोजना राबवत असताना ऑक्टोबर २०२० व जानेवारी  २०२१ या काळात रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र गेल्या महिनाभरापासून करोनाने शहरात कहर केला आहे. गेल्या आठ दिवसात तर दररोज ५ ते ७ हजार बाधित आढळत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बाधित आढळले होते. त्यात १० वर्षांपर्यंत १२८६, ११ ते २० या वयोगटात २३८८ , २१ ते ३० या वयोगटात ७१३९, ३१ ते ४० वयोगटात ८०४८, ४१ ते ५० वयोगटात ६६१९ , ५१ ते ६० वयोगटात ६०६२, ६१ ते ७० या वयोगटात ३६७४, ७१ ते ८० या वयोगटात १५२८, ८१ ते ९० या वयोगटात ३६१, ९१ ते १०० या वयोगटात ३३ आणि शंभरच्यावर तीन बाधित रुग्ण असे एकूण ३७ हजार १४१ रुग्ण आढळले होते.

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या चार महिन्यात राज्य सरकारने दिलेली विविध कार्यक्रमासाठी दिलेली शिथिलता आणि बाजारपेठा सुरू झाल्या. यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा रुग्णात वाढ सुरू झाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये १२ हजार ६४४ रुग्ण आढळल्यानंतर मार्च महिन्यात पाचपट म्हणजे ५९ हजार ८३२ रुग्ण आढळले आहे. एप्रिल महिन्यात रोज करोनाचे पाच ते सहा हजार बाधित आढळत असताना प्रशासनाने यावर नियंत्रण आणले नाही तर येणाऱ्या एप्रिल, मे महिन्यात बाधितांच्या संख्येने हाहाकार माजण्याची चिन्हे आहे.

मार्च २०२० ते मार्च २०२१ करोनाबाधित

वयोगट वर्ष     बाधित

१० पर्यंत       ६हजार २२०

११ ते २०      १२ हजार ७७५

२१ ते ३०      ३३ हजार ०२३

३१ ते ४०      ३६हजार ८५०

४५ ते ५०      ३२ हजार २६२

५१ ते ६०      २९ हजार २०१

६१ ते ७०      १७  हजार ६४६

७१ ते ८०      ७ हजार ५१८

८१ ते ९०      २ हजार ३०

९१ ते १००        १९९

१००च्या पुढे      १२