मुंबई वगळून राज्यातील ३२ प्रयोगशाळांचा समावेश

नागपूर : भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) नागपूरच्या अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेवर (एम्स) राज्यातील ३२ सह देशातील एकूण ३४ विषाणू जन्य प्रयोगशाळा तातडीने सुरू करण्याची जबाबदारी सोपवली आहे. या प्रयोगशाळेतील डॉक्टरांसह तंत्रज्ञांना करोना चाचणीचे तंत्र एम्सचे तज्ज्ञ शिकवणार असून गरजेनुसार प्रयोगशाळेसाठी विविध साहित्य मिळवून देतील. या प्रयोगशाळेला मंजुरीचेही अधिकार एम्सकडे दिले  आहेत.

एम्सच्या संचालिका मेजर जनरल डॉ. विभा दत्ता  शनिवारी व्हिडिओ कॉन्फ्रन्सद्वारे झालेल्या  पत्रकार परिषदेत म्हणाल्या, करोनावर नियंत्रणासाठी जास्तीत जास्त व्यक्तींची तपासणी व  त्यासाठी देशभऱ्यात प्रयोगशाळा वाढवणे आवश्यक आहे. या प्रयोगशाळा तातडीने सुरू करून त्यांना मंजुरी देण्यासाठी आयसीएमआरने देशातील १३ संस्थांना अधिकार दिले आहेत. नागपूर एम्सवर मुंबई वगळून राज्यातील ३२,  गोव्यातील १ आणि दादर- नगर हवेलीतील १ अशा एकूण ३४ प्रयोगशाळा सुरू करण्याची जबाबदारी आहे.  ही माहिती शुक्रवारी एम्सला दिल्यावर सेवाग्राम आणि सावंगी येथील तज्ज्ञांना प्रयोगशाळा सुरू करण्यापूर्वी प्रशिक्षणही दिले गेले.  एम्सच्या विषाणूजन्य प्रयोगशाळेच्या प्रमुख प्रा. डॉ. मिना मिश्रा म्हणाल्या, एम्सच्या प्रयोगशाळेला मान्यता मिळाल्यापासून अवघ्या पाच दिवसांत येथे ५५८ नमुन्यांची तपासणी  झाली आहे. येथे विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांची जबाबदारी  आहे.