२४ तासांत ८२ मृत्यू; नवीन ४,३९९ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ८२ करोना रुग्णांचा मृत्यू तर ४ हजार ३९९ नवीन रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, सलग सहाव्या दिवशी नवीन रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या अधिक आहे.

जिल्ह्य़ात मार्चपासून निवडक दिवस सोडल्यास सातत्याने नवीन  रुग्णांची संख्या करोनामुक्तांहून जास्त आढळत होती. परंतु ३० एप्रिल २०२१ रोजी दैनिक  रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या अधिक नोंदवली गेली. तेव्हापासून सातत्याने जिल्ह्य़ात नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक नोंदवले जात आहे. बुधवारी सलग सहाव्या दिवशी शहरात ४ हजार ६८२, ग्रामीणला २ हजार ७१८ असे एकूण ७ हजार ४०० व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ६८ हजार १८०, ग्रामीण ९० हजार ८१४ अशी एकूण ३ लाख ५८ हजार ९९४ व्यक्तींवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात २ हजार ५३४, ग्रामीणला १ हजार ८५३, जिल्ह्य़ाबाहेरील १२ असे एकूण ४ हजार ३९९ नवीन रुग्ण आढळले. नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ६ हजार ७७०, ग्रामीण १ लाख २० हजार ४८४, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार २८५ अशी एकूण ४ लाख ३२ हजार ९३८ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ४८, ग्रामीण २२, जिल्ह्य़ाबाहेरील १२ असे एकूण ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या ४ हजार ७३३, ग्रामीण १ हजार ९८०, जिल्ह्य़ाबाहेरील १२ अशी एकूण ७ हजार ८२८ रुग्णांवर पोहोचली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ६६ हजारांवर

शहरात ३६ हजार ६४८, ग्रामीणला २९ हजार ४६८ असे एकूण ६६ हजार ११६ सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ८ हजार २७८ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटरमध्ये  तर ५७ हजार ७३८ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

विदर्भात पुन्हा २५७ मृत्यू

विदर्भात तीन ते चार दिवसांपासून करोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू व नवीन रुग्णांची वाढ कमी होत असल्याचे सुखद चित्र असतानाच बुधवारी २४ तासांत २५७ रुग्णांचा मृत्यूमुळे पुन्हा चिंता वाढली आहे. तर दिवसभरात १२ हजार ५३६ नवीन रुग्णांची भर पडली. वर्धा जिल्ह्य़ातही तब्बल ३५ मृत्यू नोंदवले गेले. विदर्भात २ मे रोजी २७१ मृत्यू तर १२ हजार ५११ नवीन रुग्ण, ३ मे रोजी २२८ मृत्यू तर ११ हजार १४७ रुग्ण आढळले. ४ मे रोजी २१३ मृत्यू तर १२ हजार २२२ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे रोज मृत्यू व रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र होते. परंतु बुधवारी २४ तासांत पुन्हा मृत्यूसंख्या वाढताना दिसत आहे. दिवसभरात नागपूर शहरातील ४८, ग्रामीण २२, जिल्ह्य़ाबाहेरील १२, अशा एकूण जिल्ह्य़ात ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ३१.९० टक्केमृत्यूंचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत ४ हजार ३९९ नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात १९ रुग्णांचा मृत्यू तर ५७८ रुग्ण, अमरावतीत २४ मृत्यू तर १ हजार १६७ नवीन रुग्ण, चंद्रपूरला २३ मृत्यू तर १ हजार ३९३ रुग्ण, गडचिरोलीत १८ मृत्यू तर ५८६ रुग्ण, गोंदियात ६ मृत्यू तर ४२२ रुग्ण, यवतमाळला २६ मृत्यू तर १ हजार २३९ रुग्ण, वाशीमला ५ मृत्यू तर ४४७ रुग्ण, अकोल्यात ६ मृत्यू तर ६९४ रुग्ण, बुलढाण्यात १३ मृत्यू तर ६१४ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात ३५ मृत्यू तर ९९७ नवीन रुग्ण आढळले.

ऑटोरिक्षातील गर्भवतीला वेळीच प्राणवायू

पंचशील चौकातून एक करोनाबाधित गर्भवतीला तिचा पती ऑटोरिक्षातून एका खासगी रुग्णालयाच्या दिशेने नेत होता. महिलेला श्वास घ्यायला त्रास होत होता. खासगी रुग्णालयात जागा नसल्याने ते विविध रुग्णालयांत फिरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बाबा मेंढे यांच्या निदर्शनात आले. त्यांनी तातडीने गाडी थांबवत महिलेला स्वत:जवळील प्राणवायू सिलेंडर काढून लावले.  महिला स्थिर झाल्यावर तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२२.५९ टक्के अहवाल सकारात्मक

शहरात दिवसभरात १५ हजार २९८, ग्रामीणला ६ हजार ३१४ असे एकूण जिल्ह्य़ात २१ हजार ६१२  चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल गुरुवारी अपेक्षित आहेत. मंगळवारच्या २० हजार १७८ नमुन्यांमध्ये ४ हजार ३९९ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण २२.५९ टक्के नोंदवले गेले.

खाटांची उपलब्धता

शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालये मिळून बाधितांसाठी किती खाटा (बेड्स) उपलब्ध आहेत, याची माहिती  http://www.nmcnagpur.gov.in  व   http://nsscdcl.org/covidbeds वर  तसेच हेल्पलाईन  ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आयसीयू प्राणवायू, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल.