आज तामिळनाडू एक्सप्रेसने रामेश्वरमसाठी रवाना होणार

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या वतीने जागतिक विक्रमाच्या दृष्टीने रामेश्वरम येथून लहान उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे.  या उपक्रमात देशभरातील एक हजार विद्यार्थ्यमध्ये नागपुरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींची निवड  झाली आहे.

जिद्द आणि चिकाटीच्या भरवशावर या दोन्ही विद्यार्थिनींनी नागपूरचे नाव उंचावले आहे. महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या चार भिंतीच्या आत विज्ञानाचे धडे घेत अंतरिक्षाचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाती विनोद मिश्रा व काजल रामनरेश शर्मा या दोन्ही विद्यार्थिनी ७ फेब्रुवारीला उपग्रहांच्या जागतिक विक्रमात सहभागी होणार आहेत. उद्या गुरुवारी तामिळनाडू एक्सप्रेसने दोन्ही विद्यार्थिनी रामेश्वरमसाठी रवाना होणार आहेत. कुठल्याही शहरातील महापालिकेच्या शाळा  म्हणजे गरीब आणि त्यातही गरजू परिवारातील मुलांसाठीच आहेत, असा सर्वसामान्य  समज आहे. पण, यातील विद्यार्थी स्पर्धेत कुठेच कमी नाही.

फक्त आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठाची गरज आहे. त्यांच्याही डोळ्यात अनेक स्वप्न तरळतात, त्यांच्याही मानातील कुतुहलाचे कोडे सुटू पाहतात, ते कोडे सुटण्यासाठी विज्ञानाच्या पैलूंची जिज्ञासा त्यांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट झळकते.  ती जिज्ञासा हेरण्याची इच्छाशक्तीही आवश्यक आहे. स्वाती आणि काजलने ‘फेम्टो’ हे उपग्रह तयार केले आहे. हे उपग्रह अंतराळात ३३ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर जाऊन प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेऊन ती माहिती पृथ्वीला पाठवणार आहे.  ७ फेब्रुवारीला  असे १०० उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत. महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह अन्य अधिकारी व शिक्षकांकडून दोघींना कौतुकाची थाप आणि आशीर्वादरूपी शुभेच्छा देण्यात आल्या.