खड्डे बुजवताना समतलच केले नाहीत

(भाग – २)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर :  मेट्रोच्या खांबाखाली चालणाऱ्या लोकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. मेट्रोचे खांब उभे करताना खोदकाम केल्यानंतर योग्य पद्धतीने खड्डे बुजवण्यात येत नसून केवळ डांबराची डागडूजी करण्यात येत असल्याने मेट्रोच्या सर्व खांबांखाली खड्डय़ांची शृंखला निर्माण झाली आहे.

केंद्रासह राज्यात भाजपचे सरकार असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शहरात अनेक विकास कामांना गती मिळाली. मुंबईनंतर राज्यात नागपुरात मेट्रो येण्याचा मानही मिळाला. मेट्रोचे काम झपाटय़ाने सुरू असून आता दोन मार्गावर वाहतूकही सुरू झाली आहे. विमानतळ ते सीताबर्डीदरम्यान मेट्रोच्या मार्गाचे बरेचसे काम पूर्ण झाले असून महामार्गाच्या मधोमध मेट्रोचे खांब उभे करण्यात आले. सीताबर्डी ते हिंगणा या मार्गावरही मेट्रोचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहेत.

या दोन्ही मार्गावर मेट्रोचे रस्त्यावरील खोदकाम बंद झाले असून खड्डे बुजवले. पण, खड्डे बुजवताना मेट्रोच्या कंत्राटदारांनी केवळ डागडूजी केली आहे. त्यामुळे मेट्रोच्या प्रत्येक खांबखाली खड्डे पडले आहेत. खांबाच्या जवळून जाताना खड्डय़ामुळे अपघात होण्याची किंवा पाठीचे आजार जडण्याची  भीती असल्याने दुचाकीस्वार निम्मा रस्ता सोडून रस्त्याच्या कडेने वाहन चालवतात.  कारचालकही खांबाच्या जवळून वाहत सतत उसळत असल्याने तो भाग सोडून वाहन चालवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मेट्रोचे जमिनीवरचे बांधकाम पूर्ण होऊन रस्ता मोकळा करण्यात आला असला तरी तो वापरात येत नसल्याचे चित्र आहे.

यासंदर्भात मेट्रो प्रशासन उदासीन दिसून येत असून खांबांच्या खालचा भाग रस्त्याच्या समतल व गुळगुळीत न करताच रस्ते महापालिकेला देऊन महापालिका आपली जबाबदारी झटकताना दिसत आहे.

खड्डे बुजवण्याचा प्रयत्न

मेट्रोचा अजनी चौक ते विमानतळापर्यंतचा भाग संबंधित यंत्रणेला हस्तांतरित करण्यात आला आहे. मध्यवर्ती कारागृह ते अजनी चौकापर्यंतचा रस्ता मेट्रोकडे असून त्या भागात खांबाखाली असलेले खड्डे दुरुस्त करण्यात येतील.  हिंगणा मार्गाचे हस्तांतरण पूर्ण झाले असून त्या रस्त्यावर आता मेट्रोचे कोणतेच काम सुरू नाही.

– अखिलेश हळवे, जनसंपर्क उपमहाव्यवस्थापक, मेट्रो.