अग्निशमन वाहनांचे ताफे, १० रुग्णवाहिका पाठवल्या

वर्धा जिल्ह्य़ातील पुलगाव दारुगोळा आगाराला आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल प्रशासनाने आवश्यक ती सर्व मदत पोहोचविण्यासाठी तत्परता दाखविली.

पुलगाव दारुगोळ आगाराला आग लागल्याची माहिती सोमवारी मध्यरात्रीनंतर १.३० वाजता नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला मिळाली. आयुक्त कार्यालयातर्फे तातडीने आग विझविण्यासाठी नागपूर व यवतमाळ व वर्धा जिल्ह्य़ांतील अग्निशमन वाहनांचे ताफे पाठविण्यात आले. त्यानंतर राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याची माहिती देण्यात आली. या कक्षाने रात्रीच संरक्षण खात्याच्या दिल्ली मुख्यालयाला यासंदर्भात माहिती दिली. रात्रीपासूनच संरक्षण खात्याच्या संपर्कात प्रशासन असून, आवश्यक ती सर्व मदत तेथे पोहोचविण्यात आली आहे. सुरुवातीला दारुगोळा आगाराच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांना हलविण्याचे ठरले होते. त्यानुसार पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आग आटोक्यात आल्यामुळे स्थलांतराची गरज पडली नाही. जखमींवर उपचार करण्यासाठी सावंगी आणि सेवाग्राम येथील रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे, असे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.  दारुगोळा डेपो हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, तसेच संवेदनशील असल्याने तेथे जाण्यासाठी लष्कराचीच परवानगी आवश्यक आहे, त्यामुळे नागरी प्रशासन तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, असे अनुपकुमार यांनी स्पष्ट केले. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार वध्र्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशी मदतीसाठी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या ३०, तर आगपीडितांना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी १० रुग्णवाहिको घटनास्थळी पाठविल्याचे कुर्वे यांनी सांगितले.

वर्धा जिल्हा हा नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात आयुक्त कार्यालयातील यंत्रणा वर्धा जिल्हधिकारी कार्यालयाच्या संपर्कात आहे. दिल्ली आणि पुणे येथील लष्कराच्या कार्यालयाशीही संपर्क ठेवण्यात आला आहे.

पुलगाव दारुगोळा आगाराला लागलेली आग विझविण्यासाठी, तसेच तेथील जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर १.५० वाजेपासून यंत्रणा कामाला लागली आहे.

अनुपकुमार, विभागीय आयुक्त, नागपूर