काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; शिवसेनेची वाटचाल स्वबळाच्या दिशेने

नागपूर : राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘महाविकास आघाडी’ सत्तेत असली तरी नागपूर जिल्हा परिषदेत मात्र शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीपासून सध्या तरी दूर राहण्याचेच ठरवले आहे. सेनेने स्वतंत्र उमेदवार उभे करून स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काही जागांवर तडजोड होण्याची शक्यता आघाडीतील नेत्यांनी वर्तवली आहे.

सात वर्षांनंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत असून त्यासाठी ७ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. ५८ सदस्यीय जिल्हा परिषदेत दहा वर्षांपासून भाजप व त्यांच्या मित्रपक्षाची सत्ता होती. भाजपच्या मित्रपक्षात शिवसेनेचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटली व काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाविकास आघाडी तयार होऊन त्यांचे राज्यात सरकार आले. हीच आघाडी पुढच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका लढवेल, असे आघाडीतील तीनही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नागपूरला आले असता त्यांनीही याला दुजोरा दिला होता. तसेच ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत तेथे स्थानिक पातळीवरील तीनही पक्षांमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचे आणि ज्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका आहेत तेथे युती करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. मात्र नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही युती आकारास येऊ शकली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची या निवडणुकीत आघाडी आहे, मात्र सेनेने सध्या तरी सर्वच विभागांमध्ये उमेदवार देऊन स्वबळाच्याच दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी  ५८ जागांसाठी तब्बल ४९७ उमेदवार रिंगणात होते. माघारीची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे. तोपर्यंत आघाडीत सेना सहभागी होईल, अशी आशा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना असली तरी सेनेकडून मात्र याबाबत ठामपणे काहीही सांगितले जात नाही. सेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाप्रमुखांना याबाबत अधिकार दिल्याचे स्पष्ट केले.

बरखास्त जिल्हा परिषदेत ५८ पैकी २३ भाजपचे आणि १४ शिवसेनेचे असे एकूण ३७ युतीचे सदस्य होते. काँग्रेस १४ आणि राष्ट्रवादीचे ११ मिळून २५ सदस्य होते. नवीन समीकरणाचा विचार केला तर सेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून एकूण सदस्य संख्या ३९ होते. निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढण्यासाठी या आकडय़ांचा आधार तीनही पक्षाचे नेते देत होते. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी झाली. सेनेला सोबत घेण्यासंबधी प्राथमिक पातळीवर या पक्षाच्या नेत्यांशी चर्चाही झाली. मात्र नंतर ती फिस्कटली. जिल्ह्य़ात एकूण सहा आमदार आहेत. त्यापैकी प्रत्येकी दोन काँग्रेस व भाजप, एक राष्ट्रवादी आणि एक अपक्ष (सेना बंडखोर)आहे. सावनेर, उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, काटोलमध्ये राष्ट्रवादी, रामटेकमध्ये सेनेचे प्राबल्य आहे. कामठी व हिंगण्यात भाजपची ताकद आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढली असती तर भाजपला निवडणूक जड गेली असती. सेनेमुळे आता तिरंगी  लढत होण्याची शक्यता आहे. याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

तिकीट वाटपावरून नाराजी :

तिकीट वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नाराजी उघड झाली आहे. भाजपने माजी जि.प. अध्यक्षांसह अनेक विद्यमान सदस्यांना तिकीट नाकारल्याने ते नाराज आहेत. आरक्षणामुळे अनेकांना निवडणुकीपासून दूर राहावे लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि रमेश बंग यांचे पुत्र दिनेश यांनी जि.प.च्या राजकारणात या निवडणुकीच्या निमित्ताने उडी घेतली आहे. काटोल तालुक्यात सर्वपक्षीय नाराजांची एक आघाडी तयार झाली आहे.

शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. अर्जमागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत चित्र स्पष्ट होईल.

– राजेंद्र मुळक, अध्यक्ष जिल्हा काँग्रेस.

 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे सर्वाधिकार जिल्हाप्रमुखांना दिले आहे. आम्ही आघाडीबाबत सकारात्मक आहोत. अंतिम निर्णय जिल्हाप्रमुखांनाच घ्यायचा आहे.  – कृपाल तुमाने,  शिवसेना खासदार रामटेक.