व्यवस्थापन परिषदेत निर्णय

नागपूर : करोना आणि टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांत कुठल्याही शुल्कात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर टीचर्स असोसिएशनने कुलगुरूंकडे हा विषय लावून धरला असून या निर्णयामुळे विद्यापीठातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने उद्योगधंद्यासह विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्यात आलीत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले. शेतीवर मोठा परिणाम झाला. रोजगाराची संसाधनेही हिरावल्या गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठीही पालकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क भरता येणे शक्य नाही. विद्यापीठाकडून दरवर्षी शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव असतो. करोनामुळे जिल्हाबंदी लागू आहे. अशा परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय शुल्कवाढ झाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच थांबण्याची शक्यता निर्माण झाली होती. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने याबाबत कुलगुरूंकडे निवेदन सादर करीत यावर्षी शैक्षणिक सत्रात कुठल्याच प्रकारची शुल्कवाढ करू नये, अशी मागणी केली होती. तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांनी सातत्याने हा विषय कुलगुरूंकडे लावून धरला होता. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यंदाच्या शैक्षणिक वर्षांत कुठल्याच प्रकारची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यामुळे विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.

अकरावी प्रवेशाला सुरुवात

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला सुरुवात झाली असून १५ जुलैपासून विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी यासंदर्भात नुकतेच वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता दहावीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नसला तरी निकालाच्या आधी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून अर्जाचा भाग १ भरता येणार आहे.  दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग-२ भरता येणार आहे. यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पर्याय निवडता येणार आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी सुरुवातीला शहरातील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयांची १ जुलैपासून नोंदणी सुरू झाली होती. करोनामुळे निकालाची प्रक्रिया रखडली असली तरी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने यंदा अकरावीची ऑनलाईन प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली आहे. यंदा प्रवेशाच्या अतिरिक्त फेऱ्यांची मर्यादा काढून टाकण्यात आल्याने रिक्त जागांनुसार नंतर फेरी घेतली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशाचा अर्ज भरताना संसर्गामुळे होणारा थेट संपर्क रोखण्यासाठी माहिती पत्रक, शुल्क आकारणी हे सर्व काम ऑनलाईन करावे लागणार आहेत. उपसंचालक कार्यालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाविद्यालयांना शाखा, माध्यम, प्रवेश शुल्क, जागा क्रमांक यासारखी सर्व माहिती उपसंचालक कार्यालयाकडे सादर केलेल्या माहितीनुसार भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात काही बदल झाल्यास त्यांना उपसंचालक कार्यालयाला कळवण्यास सांगण्यात आले आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केल्यास ऑनलाईन प्रत

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केल्यास त्यांना उत्तरपत्रिकांची ऑनलाईन प्रत देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. करोना संसर्गाचा वाढता धोका बघता शिक्षण मंडळाने विद्यार्थी कल्याणाचा हा निर्णय घेण्यात आल्याचे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव रविकांत देशपांडे यांनी सांगितले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यांकनाचे निरीक्षण करता येणार आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियामधील माध्यमिक शिक्षणाधीकारी आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्याना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत.