भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहरातून देशाच्या चारही दिशांसाठी रेल्वेगाडी धावत असून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या आणि मालवाहतूक वाढल्याने विद्यमान रेल्वेमार्ग कमी पडू लागले आहेत. यामुळे रेल्वेने तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्ग टाकण्याच्या कामांना मान्यता दिली असून नागपूर ते सेवाग्राम तिसऱ्या मार्गाचे काम देखील सुरू झाले आहे. वर्धा- बल्लारशहा, नागपूर- इटारसी, कळमना- राजनांदगाव तिसऱ्या मार्गाला २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली. शिवाय नागपूर ते वर्धा चौथ्या मार्गाची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

हावडा मार्ग, ग्रँड ट्रँक (दक्षिण) मार्ग तसेच मुंबई आणि दिल्ली मार्ग प्रचंड व्यस्त आहे. या मार्गावर दररोज सरासरी १२० ते १३० गाडय़ा धावतात. या सर्व मार्गावरून रेल्वेगाडय़ा सोडण्याची क्षमता ओलांडली गेली आहे. या मागार्ंची क्षमता १५० टक्के ओलांडली गेली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एक अतिरिक्त मालगाडी देखील या मार्गावर सोडायचे झाल्यास त्याचा नियमित गाडय़ांपैकी काही गाडय़ांवर परिणाम होतो. नागपूर ते वर्धा आणि वर्धा-बल्लारशहा अत्यंत व्यस्त मार्ग आहे. नागपूरचे वाढते महत्त्व आणि नवीन गाडय़ा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी बघता अस्तित्वातील रेल्वेमार्गावर ते शक्य नाही. शिवाय मध्य भारतातून कोळसा वाहतूक रेल्वेने केली जाते. या सर्व गाडय़ा चालवण्यासाठी नवीन मार्ग टाकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रेल्वेने नागपूरपासून २०० ते ३०० किलो मीटर अंतरापर्यंत तिसऱ्या मार्गाच्या कामांना मंजुरी दिली आहे. नागपूर- वर्धा मार्गावर तिसरा मार्ग देखील कमी पडणार असल्याने येथे चौथ्या मार्गाची देखील घोषणा करण्यात आली आहे. त्याची अंदाजित किंमत ९१२ कोटी आहे. हा प्रकल्प सार्वजनिक- खासगी भागीदारीतून करण्यात येणार आहे.

नागपूर- वर्धा तिसऱ्या रेल्वेमार्गाला २०१२ मध्ये मान्यता मिळाली होती. त्याचे काम अजूनही सुरू आहे. या मार्गावर आतापर्यंत सुमारे साडेबारा कोटी रुपये खर्च झाले आहेत. या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. तिसरा मार्ग झाल्यावर हा भार थोडा हलका होईल, पण तिसरा मार्ग पूर्ण होईस्तोवर वाहतुकीत आणखी भर पडेल, असा अंदाज बांधून चौथा मार्ग घोषित करण्यात येईल. याशिवाय नागपूर ते इटारसी आणि नागपूर ते बल्लारशहा यासाठी मागील अर्थसंकल्पात ३९५ कोटींची तरतूद करण्यात आली.

फायदे

* या मार्गाचा क्षमतेच्या १४० ते १५० टक्के वापर सुरू आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

* प्रवासी तसेच मालगाडय़ा अधिक प्रमाणात सोडता येतील.

* नवीन मेल, एक्सप्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याच्या अनेक मागण्या आहेत. या गाडय़ा सुरू करता येतील.

* रेल्वेमार्गाची देखभाल-दुरुस्ती अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.

* नागपूर-वर्धा, अंतर ७६ कि.मी., मान्यता २०१२, प्रकल्प किंमत २८६ कोटी.

* वर्धा-बल्लारशहा, अंतर १३२ कि.मी., मान्यता २०१५, प्रकल्प किंमत १,४४३.३२ कोटी.

* इटारसी-नागपूर, अंतर २६७ कि.मी., मान्यता २०१५, प्रकल्प २,३२६ कोटी.

* कळमना-राजनांदगाव, अंतर २२८.३ कि.मी., मान्यता २०१५, प्रकल्प किंमत १९०८.५१ कोटी.

 * राजनांदगाव-कळमना तिसरा रेल्वेमार्ग पिंक बुकमध्ये २०१५-१६ ला मान्यता मिळाली आहे. या मार्गाचा क्षमतेच्या १३० ते १४० टक्के उपयोग सुरू आहे. तिसरा मार्ग प्रकल्पासाठी १५७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असे वरिष्ठ विभागीय परिचलन व्यवस्थापक सचिन शर्मा म्हणाले.