नागपुरातही ‘मिशन बिगेन-अगेन’;  प्रतिबंधित क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच कठोर नियम

नागपूर : महापालिकेने पाचव्या टप्प्यातील टाळेबंदी ३० जूनपर्यंत वाढवतानाच राज्य शासनाच्या ‘मिशन बिगेन अगेन’ या धोरणानुसार  प्रतिबंधित क्षेत्र वगळता तीन टप्प्यात काही गोष्टींना परवानगी दिली आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज १ जून रोजी पाचव्या टाळेबंदीसंदर्भातील नियमावली जारी केली. ३ जूनपासून मॉर्निग वॉक  आणि सायकलिंगला परवानगी देण्यात आली आहे. दुकाने-व्यापारपेठा सुरू ठेवण्यासाठी सम-विषम (ऑड-इव्हन) सूत्र निश्चित करण्यात आले आहे. प्रतिबंधित वस्त्यांमध्ये मात्र कोणत्याही सवलती देण्यात आल्या नाहीत. ३० जूनपर्यंत ही टाळेबंदी कायम असणार आहे. टाळेबंदीतील नियम शिथिलतेचा पहिला टप्पा तीन जूनला, दुसरा पाच तर तिसरा आठ जूनपासून सुरू होणार असल्याचे महापालिकेने सोमवारी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

टाळेबंदीच्या काळात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता आणि १० वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक कार्य अथवा वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, घरातच राहावे, असेही आदेशात नमूद केले आहे.

सवलतीचा पहिला टप्पा (उद्यापासून)

  • सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी सार्वजनिक ठिकाणी, उद्यानात, खासगी मैदानांवर, सोसायटी तसेच संस्थात्मक मैदानांवर पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी परवानगी नाही.
  •   प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना नियम पाळून काम करण्याची परवानगी.
  •   गॅरेज तसेच वर्कशॉप यांना पूर्वपरवानगी घेऊन काम करण्याची मुभा.
  •   सर्व सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे अधिक त्यांच्या उपस्थितीत परवानगी.

सवलतीचा दुसरा टप्पा (५ जूनपासून)

  •   मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू  करण्यास परवानगी. यासाठी सम आणि विषम सूत्र वापरणार, सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषय तारखेला समोरच्या रस्त्यातील दुकाने खुली राहणार.
  •   अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी १ चालक १ प्रवासी, रिक्षा १ चालक २ प्रवासी, खासगी चारचाकी १ चालक २ प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवास करण्याची परवानगी.
  • कपडय़ाच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार.
  •   खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत, अथवा सायकलने जाण्याच्या सूचना.
  • अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई.
  •   खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.

सवलतीचा तिसरा टप्पा (८ जूनपासून)

  •    सर्व खासगी कार्यालये १० टक्के कर्मचारी उपस्थितीने चालवण्यास परवानगी, उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय.
  •    कामाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना.

हे बंद असेल

  •   शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस
  • आंतरराष्ट्रीय विमानसेवा,मेट्रो
  •    स्वीमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट
  •   कोणत्याही स्वरूपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम  विविध धर्मियांची  प्रार्थनास्थळे

हे बंधनकारक

  •    सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक
  •   सहा फुटांचे अंतर पाळणे आवश्यक
  •     लग्नासाठी ५० हून अधिक लोकांना परवानगी नाही
  •    अंत्यसंस्कारासाठी २० हून अधिक लोकांना परवानगी नाही
  •   सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गुन्हा
  •    सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू यांच्या सेवनावर प्रतिबंध