आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

नागपूर : राज्य शासनाने मॉल्स आणि इतर आस्थापने सुरू करण्याबाबत काढलेले आदेश ५ ऑगस्टपासून नागपूर शहरात जसेच्या तसे लागू करण्यात येणार आहेत. मॉल्स आणि दुकानांचे संकूल सुरू करता नियमभंग झाल्यास दंड किंवा थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

आज मंगळवारी  आमदार निवासातील कोविड  केअर सेंटरला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आयक्त म्हणाले,

चार महिन्यांपासून बंद असलेले मॉल्स आणि दुकानांचे संकूल उद्या, बुधवारपासून सुरू होत आहेत. त्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मॉल्समधील चित्रपटगृह व फूड झोन बंदच राहतील. केवळ पार्सल सुविधा सुरू राहील. मैदानी खेळास (आऊटडोअर) देखील उद्यापासून सुरू करण्यास परवानगी आहे. मात्र जलतरण तलाव बंद राहतील. टॅक्सी, कॅबमध्ये ४ (चालकासह), रिक्षामध्ये ३, चारचाकीमध्ये ४ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र मुखपट्टी, शारीरिक अंतर आणि इतर नियमांचे पालन न झाल्यास दुकानदांराविरुद्ध ५ हजार, ८ हजार किंवा १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. याशिवाय दुकानाला टाळे लावण्याचे आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, असेही मुंढे यांनी सांगितले.

दरम्यान, आज  मुंढे यांनी आमदार निवास येथील कोविड सेंटरला भेट दिली आणि व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच रुग्ण आणि नागरिकांशी साधला संवाद साधला. मुंढे यांनी पाचपावली पोलीस वसाहतीत सरू करण्यात आलेल्या कोविड चाचणी केंद्राला भेट दिली. लक्षणे असतील तर रुग्णालयात उपचार होतील. लक्षणे नसतील तर गृह विलगीकरणात पाठवण्यात येईल. जर चाचणी नकारात्मक आली तरी नियम पाळावेच लागतील. त्यामुळे काळजी घ्या आणि शहराला सुरक्षित ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

करोनाग्रस्तांशी संवाद

आमदार निवासात नवे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. याठिकाणी मुंढे यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. बाधितांच्या खोल्यांमध्ये जाऊन थेट त्यांच्याशी संवाद साधला.