लोकसत्ता टीम

चंद्रपूर : क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी विधानसभेत ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविणार असल्याची घोषणा आज राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केली. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात अशासकीय ठराव मांडला होता. या ठरावाला उत्तर देताना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी यासंदर्भात पुढील आठवड्यात विधानसभेत ठराव संमत करणार असल्याची घोषणा केली.

आमदार सुधीर मुनगंटीवार विधानसभेतील १०० आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र देशगौरव,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार आहेत. आ. मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत अशासकीय ठराव मांडला होता. क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी वंचितासाठी व महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न द्यावा, यासाठी विधानसभेने ठराव करावा, अशी मागणी आ . मुनगंटीवार यांनी केली. 

ही मागणी करताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महात्मा फुले दाम्पत्याने केलेल्या कार्याचा गौरव केला. आज विधानसभेत २१ महिला आमदार आहेत. त्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागाचे फळ आहे. या दाम्पत्याने पुरोगामी व मानवतेचा विचार मांडला. समाजप्रबोधनाची नवी चळवळ देशात उभी केली. यातून महाराष्ट्राची जडणघडण झाली.अशा व्यक्तींना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन हे सभागृह पावन होईल, अशी भावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. 

येत्या १० मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीच्या दिवशी हा ठराव झाला तर औचित्याला धरून होईल, असे सांगून आ. मुनगंटीवार म्हणाले, हा ठराव झाल्यानंतर त्यांचा पाठपुरावा सुद्धा करण्यात यावा. आतापर्यंत ४८ जणांना भारतरत्न या सन्मानाने गौरन्वित करण्यात आले. यात १४ जणांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आले आहे. केंद्र सरकारने ४९ वा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना बहाल करावा, अशी मागणी केली.

या अशासकीय ठरावावर बोलताना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेल्या भावना हा या राज्य सरकारच्या भावना असल्याचे म्हटले आहे. फुले दाम्पत्य हे देशासाठी नव्हे तर जगासाठी एक मार्गदर्शक आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून यासंदर्भात पुढील आठवड्यात विधानसभेत आ. मुनगंटीवार यांनी दिलेला अशासकीय ठराव शासकीय ठराव म्हणून मांडण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिमानाचा आणि सौभाग्याचा क्षण

अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर, देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न’ देण्यासंदर्भातील ठराव आज जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेमध्ये मांडताना हा क्षण मला अभिमानाचा आणि सौभाग्याचा ठरला. शिक्षण नावाचं अद्भुत अमृत ज्या महान व्यक्तिमत्वामुळे आपणा सर्वांना प्राशन करता आले ते या भारतातील महान रत्न जगभरात ‘भारतरत्न’ म्हणून ओळखले जाणे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. सदरचा प्रस्ताव शासन विधानसभेमध्ये शासकीय ठरावाच्या माध्यमातून आणत आहे त्याबद्दल शासनाचे अभिनंदन व आभार व्यक्त करतो, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.