लोकसत्ता टीम

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत २९ नक्षलवादी ठार झाले. यात नक्षल्यांचा कमांडर शंकरराव याचा समावेश असून ही चकमक छोटे बेठिया पोलीस ठाणे क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या कांकेर, नारायणपूर आणि गडचिरोली या नक्षल्यांच्या ‘ट्राय जंक्शन’मध्ये घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटे बेटिया पोलीस हद्दीतील जंगल परिसरात मोठी नक्षल कारवाई सुरू असल्याची गुप्त माहिती छत्तीसगड पोलिसांना १६ एप्रिल रोजी मिळाली. बीएसएफ आणि कांकेर जिल्हा राखीव गार्ड यांची संयुक्त टीम त्या परिसरात नक्षलविरोधी अभियानासाठी जात असताना दुपारी त्यांच्यावर अचानक गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २९ नक्षलवादी ठार झाले. यात नक्षलवाद्यांचा कमांडर शंकरराव हा देखील ठार झाला. तीन जवान जखमी झाले.

आणखी वाचा-यंदा प्रचारातून कृषी, रोजगार, शिक्षण, महागाई, आरोग्याचे मुद्दे गायब! प्रमुख प्रश्नांना नेत्यांची बगल…

चकमकीच्या ठिकाणाहून २९ मृतदेह सापडले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आधुनिक रायफल, सात ऐके ४७ रायफल, तीन एलएमजी जप्त करण्यात आले. चकमकीत ठार झालेला शंकर राव याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. उर्वरित मृतदेहांची ओळख पटविण्यात येत असून यात आणखी काही मोठ्या नक्षल नेत्यांचा समावेश असू शकतो. पोलिसांनी मागील काही वर्षात केलेल्या नक्षलविरोधी कारवाईतील ही मोठी कारवाई आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले असून परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. हा परिसर गडचिरोली जिल्ह्याला लागून असल्याने चकमकीनंतर यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.