नागपूर : सर्वसाधारण तिकीट खरेदी करून शयनयान श्रेणीतून प्रवास करणे किंवा विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेने गेल्या वर्षभरात ३०३.३७ कोटींचा दंड वसूल केला आहे.

रेल्वेगाड्यांची संख्या आणि प्रवाशांची संख्या यांचे व्यस्त प्रमाण आहे. देशातील प्रमुख मार्गावर वर्षभर रेल्वेगाडीला ‘कन्फर्म’ तिकीट मिळणे जिकरीचे काम आहे. काही दिवसआधी किंवा ऐनवेळी प्रवास करायची वेळ आल्यास रेल्वेत ‘आरएसी’ तिकीटदेखील मिळू शकत नाही, अशी स्थिती असते. त्यामुळे नाईलाजाने सर्वसाधारण श्रेणीचे तिकीट खरेदी करून शयनयान डब्यात बसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांकडून तिकीट तपासणीस प्रवास भाडे आणि दंडाची रक्कम आकारून प्रवास करू देतात. अशाप्रकारे रेल्वे तिकीट तपासणी मोहिमेत २०२२-२३ या आर्थिक वर्षांत रेल्वेने ४६ लाख ८६ हजार प्रवाशांकडून तब्बल ३०३.३७ कोटी रुपये दंड वसूल केले आहे. तर चालू आर्थिक वर्षात जूनपर्यंत १३३९.५५ हजार प्रवाशांकडून ९४.०४ कोटी रुपये वसूल करण्यात आहे.

हेही वाचा – जवानांच्या बलिदानाची गाथा यावर्षी सातवीच्या पुस्तकात; विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविण्याचा हेतू

रेल्वे तिकीट तपासणीस स्थानक तसेच धावत्या गाडीत तिकीट तपासणी करीत असतात. रेल्वेस्थानकावर विनातिकीट प्रवासी आढळल्यास रेल्वे तिकीट तपासणीस त्यांना रेल्वे दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करतात. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, भुसावळ, मनमाड, खांडवा, नागपूर, दौंड आणि पुणे या विविध रेल्वेस्थानकांवर रेल्वे दंडाधिकारी नियुक्त केले आहेत. रेल्वे दंडाधिकारी सुनावणीअंती प्रवाशांना दंड करीत असतात. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रात धावत्या गाड्यांमध्ये तपासणी केली जाते आणि स्थानकांवर न्यायालये भरवली जातात, तर मध्य प्रदेश भागात धावत्या गाडीमध्ये तपासणी तसेच फिरते न्यायालये आयोजित केली जातात.

हेही वाचा – इंडिया आघाडीला विरोधी पक्षनेता बनवता येईल एवढ्या जागा मिळणार नाही, बावनकुळे असे का म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिकीट तपासणी महसुलात मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३०३.३७ कोटी रुपये मिळाले आहेत. रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेला २३५.५० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. तिकीट तपासणीचा हा सर्वाधिक महसूल आहे. – शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.