बुलढाणा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यात झालेल्या गणनेत दोन वाघांसह ३११ विविध वन्य प्राण्याचे दर्शन झाले. या गणनेमुळे अभयारण्यातील वन्यजीव वैभव नव्याने सिद्ध झाले. १७ पाणवठ्यावर उभारण्यात आलेल्या १७ मचनावरून २३ मे च्या दुपारी १२ ते आज २४ तारखेच्या सकाळी ८ वाजेपर्यंत ही गणना करण्यात आली. १० पाणवठ्यावर वनपाल, वनरक्षक, वनमजुर व चिखलदरा येथील प्रशिक्षण केंद्रातील वनरक्षक यांनी गणना केली. तसेच १० पाणवठ्यावर मुंबई, अमरावती, परभणी, अकोला, खामगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील टूनकी (तालुका संग्रामपूर) येथील निसर्गप्रेमी या निसर्ग अनुभवात सहभागी झाले.

हेही वाचा >>> मतमोजणीसाठी १२० टेबलचे नियोजन, प्रथम टपाल मतांची मोजणी

उपवनसंरक्षक एन. जयकुमारन यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्या नियोजनाखाली ही गणना करण्यात आली.या गणनेत दोन वाघ, बारा गवे, दहा अस्वल, सव्वीस निलगाय, एकोणतीस सांबर, चार चौसिंगा, सदोतीस रानडुक्कर आढळून आले. याशिवाय चौऱ्या हत्तर मोर, दोन रानकुत्रे, अकरा मेडकी, एकशे अकरा माकड, दोन मसण्या उद, एक लांगुर, पाच रानकोंबडी आढळून आल्या. या गणनेत एकूण तीनशे अकरा प्राणी आढळून आले.

हेही वाचा >>> १८ वाघ.. सहा बिबट अन्  बुद्धपोर्णिमेच्या रात्रीचा थरार

दोन दिवस जंगल सफारी बंद

सातपुडा पर्वत रांगेतील अंबाबरवा अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्यात समाविष्ट १९ बीटच्या १५ हजार ८३९.७५ हेक्टर विस्तार इतका अंबाबरवा अभयारण्यचा विस्तार आहे. अंबाबरवा अभयारण्यात एकूण ५ वर्तुळ( सर्कल) तर १९ बीट आहेत.  अभयारण्यात नैसर्गिक ७ तर कृत्रिम २४ असे एकूण ३१ पाणवठे आहेत. यंदाच्या निसर्ग अनुभव साठी जय्यत नियोजन करण्यात आले होते. बुध्द पोर्णिमेच्या रात्री  २३ मे रोजी वन्य प्राण्यांची गणना होणार असल्याने  २३ च्या दुपारपासून २४ में च्या सकाळपर्यंत जंगल सफारी बंद ठेवण्यात आली.गेल्या वर्षी निर्सग प्रेमीना वन्य विभागाकडून प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र यावर्षी १० पाणवठ्यावर प्रवेश देण्यात येणार असल्याने वन्य प्राणी निर्सग प्रेमींमध्ये उत्साह संचारला होता.   प्राणी गणनेसाठी १९ वनरक्षक, ४९ वनमजूर, ५ वनपाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. सोनाळा परिक्षेत्र अधिकारी सुनिल वाकोडे यांनी ही माहिती दिली.