चंद्रपूर:जागतिक वसुंधरा दिनानिमित्त, पिंजोर (हरियाणा) येथून २० लांब आणि १४ पांढऱ्या रंगाची गिधाडे महाराष्ट्र वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. पक्षी जटायू संवर्धन प्रजनन केंद्र पिंजोर येथून महाराष्ट्रातील ताडोबा, मेळघाट व पेंच येथे आणण्यात येणार आहे. यामध्ये ताडोबात प्रकल्पात पाच, पेंच येथे १४ तर मेळघाट प्रकल्पात १५ गिधाड आणली जाणार आहेत. बुधवारी सायंकाळ पर्यंत ही गिधाडे पोहचणार आहेत.
भारतात गिधाडांच्या पुनर्प्रदर्शन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, एकूण ३४ बंदिस्त जातीची गिधाडे, यामध्ये २० लाँग-बिल आणि १४ पांढरे-गिधाड (जटायू) गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र, पिंजोर येथून महाराष्ट्रातील तीन प्रमुख स्थळांवर यशस्वीरित्या हस्तांतरित करण्यात आली आहेत. यामध्ये मेळघाट प्रकल्पात १५, पेंच येथे १४ आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ५ गिधाडांचा समावेश आहे. मंगळवार २२ एप्रिल रोजी करण्यात आलेले हे हस्तांतरण मध्य भारतातील गंभीरपणे धोक्यात असलेल्या गिधाडांच्या संख्येला पुनरुज्जीवित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यावेळी ही सर्व गिधाडे २ ते ६ वर्षे वयोगटातील आहेत. या सर्व गिधडांची सर्वसमावेशक
आरोग्य तपासणीनंतर त्यांची तंदुरुस्ती बघूनच जंगलात सोडण्यासाठी निवड केली गेली आहे. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि जंगलात यशस्वी प्रजननासाठी केले आहे. प्रवासा दरम्यान तणाव कमी करण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक बॉक्समध्ये एक पक्षी याप्रमाणे गिधाडांची वाहतूक वैयक्तिक लाकडी पेट्यांमध्ये करण्यात आली. वाहतुकीपूर्वी, पक्ष्यांना मानक प्रोटोकॉलनुसार दोन दिवस अगोदर शेवटचा आहार दिला गेला आहे. पक्ष्यांना तीन वातानुकूलित टेम्पो ट्रॅव्हलर्समध्ये आणण्यात आले. जेणेकरून संपूर्ण संक्रमणामध्ये तापमान आणि वायुवीजन चांगले राहावे. या टीमचे नेतृत्व ताडोबा प्रकल्पातील कोळसाचे
वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन काटकर यांनी केले. त्यांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मयंक बर्डे, वरिष्ठ जीवशास्त्रज्ञ मनन महादेव, बॉम्बे नॅचरल हिस्टी सोसायटी आणि ताडोबा व पेंचच्या दोन वनरक्षकांची सोबत होती. हरियाणाचे मुख्य वन्यजीव वॉर्डन विवेक सक्सेना, मुख्य वन्यजीव संरक्षक श्रीनिवास राव आणि संचालक बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांचे निरीक्षण व मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. गिधाडांचे संवर्धनासाठी ताडोबात क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुल्का, पेंचचे क्षेत्र संचालक किशोर मानकर, मेळघाटचे आदर्श रेड्डी यांनी पक्षांच्या सुरक्षिततेची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने पिंजोरमध्ये हरियाणा सरकार, भोपाळमध्ये मध्य प्रदेश सरकार, राजाभटखवा येथे पश्चिम बंगाल सरकार आणि राणी, गुवाहाटी येथे आसाम सरकार यांच्या भागीदारीत देशभरात चार जटायू संवर्धन केंद्रे स्थापन केली आहेत. या संवर्धन प्रजनन कार्यक्रमाद्वारे, बॉम्बे नॅचरल हिस्टी सोसायटीने २००४ पासून पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, संबंधित राज्य सरकारे आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी रॉयल सोसायटी यांच्या सहकार्याने ७०० हून अधिक पक्ष्यांचे प्रजनन करून भारतातील गिधाडांचे भविष्य सुरक्षित करण्यात योगदान दिले आहे.
ताडोबा प्रकल्पत एकूण पाच गिधाडे आणण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात दहा गिधाडे ताडोबात आणली होती. त्यातील २ गिधाडे जिवंत आहेत. या गिधडांची येथे योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल. – आनंद रेड्डी येल्लू उपसंचालक, कोर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प