शनिवारी पहाटे आलेल्या पुरामुळे नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने फक्त घरगुती साहित्याचेच नुकसान झाले नाही तर विद्यार्थ्यांची अभ्यासांची पुस्तके, वह्यासुद्धा भिजल्या. धंतोलीतील शासकीय जिल्हा ग्रंथालयातील चार हजारावर पुस्तके पाण्यात भिजली आहेत. नागपुरात पूर येऊन पाच दिवस झाले तरी पुरामुळे झालेल्या नुकसानीचे रोज नवनवे आकडे पुढे येत आहेत. पुराचे पाणी घरात शिरल्याने टीव्ही, फ्रीज, धान्यांसह घरगुती वस्तूंची मोठ्या प्रमाणात हानी झाली.
हेही वाचा >>> प्लास्टिक बंदी असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा गम बूटसोबत खेळ
या सर्व वस्तू आता रस्त्यावर सुकण्यासाठी ठेवल्या आहे. पण, या वस्तूंसोबत मुलांच्या अभ्यासाची पुस्तके, वह्या, नोट्ससुद्धा खराब झाल्या आहे. त्यामुळे मुलांनी अभ्यास कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डागा लेआऊट, काछीपुरा, ग्रेट नागरोडवरील नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये फेरफटका मारला असता अनेकांच्या अंगणात पुस्तके सुकायला टाकलेली दिसतात. डागा लेआऊटमधील रहिवासी चांडक यांच्या अंगणात पुस्तके, वह्या सुकण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. धंतोलीतील जिल्हा ग्रंथालयात पुराचे पाणी शिरल्याने तेथील ग्रंथसंपदा भिजली. यात अनेक महत्त्वाची पुस्तके आहेत. लोखंडी रॅकच्या खालच्या कप्प्यातील पुस्तकांना अधिक फटका बसला. ग्रंथालयातील वाचन कक्षासह इतर ठिकाणी आता पुस्तके सुकण्यासाठी ठेवण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून आम्ही पुस्तके सुकवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोनोने यांनी सांगितले.