नागपूर: वाढत्या वीज देयकाने राज्यातील सगळेच ग्राहक त्रस्त आहे. मध्यंतरी राज्य वीज नियामक आयोगाने सुनावणीनंतर वीज दर कमी करण्याचे आदेश जारी केल्यावर महावितरणने आक्षेप घेतला. त्यामुळे दर कमी झाले नाही. परंतु महाराष्ट्रात ५ लाख ग्राहकांचे प्रत्येक वर्षी वीज देयकात प्रत्येकी १२० रुपये वाचत आहे. या योजनेबाबत आपण जाणून घेऊ या.
‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या उदात्त हेतूने महावितरण ‘गो- ग्रीन’ योजना जाहीर केली आहे. यापूर्वी या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दरमहा १० रुपये सवलत मिळत होती. मात्र, आता महावितरणने योजनेत बदल करत पहिल्याच बिलात पुढील १२ महिन्यांसाठी थेट १२० रुपये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
या बदलामुळे नागपूर जिल्ह्यातील १९ हजार ३७० आणि वर्धा जिल्ह्यातील ३ हजार २४३ ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ चा पर्याय निवडला असून, पर्यावरण संरक्षणाला हातभार लावत वार्षिक १२० रुपयांची बचत करण्यास सुरुवात केली आहे. योजनेत नावनोंदणी केलेल्या ग्राहकांना महावितरण नियमितपणे छापील बिलाऐवजी त्यांच्या ईमेल आयडीवर वीज बिल पाठवले जाते.
‘गो ग्रीन’ निवडणाऱ्या ग्राहकांना पहिल्याच बिलात एकरकमी १२० रुपये सवलत मिळत असल्याने, ग्राहकांना आता प्रत्येक महिन्यात मिळणाऱ्या सवलतीची प्रतीक्षा करण्याची गरज राहिलेली नाही. राज्यात महावितरणच्या ३ कोटींहून अधिक लघुदाब वीज ग्राहकांपैकी आतापर्यंत ५ लाख ३ हजार १६९ ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ चा पर्याय स्वीकारला आहे.
भविष्यात ही संख्या आणखी वाढावी, यासाठी महावितरणने ‘गो ग्रीन’ निवडणाऱ्या ग्राहकांना त्वरित १२० रुपये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मागील चार महिन्यांत ‘गो ग्रीन’ चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत तब्बल ४१ हजारांहून अधिक वाढ झाली आहे.
ई- मेलवर वीज देयक…
महावितरणने सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना ‘गो ग्रीन’ सेवा निवडण्यासाठी एसएमएसद्वारे माहिती पाठवली आहे. या सेवेची निवड केल्यावर ग्राहकांना त्वरित १२० रुपये सवलत मिळते. योजनेनुसार पुढील वर्षभर व नोंदणी रद्द करेपर्यंत त्यांच्या ईमेलवर वीज बिल पाठवले जाते. त्यानंतरही दरमहा १० रुपये सवलत कायम राहणार आहे.
असा घ्यावा योजनेचा लाभ?
महावितरणने सर्व ग्राहकांना या पर्यावरणपूरक योजनेचा लाभ घेण्याचे नम्र आवाहन केले आहे. ‘गो ग्रीन’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांनी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला किंवा महावितरण मोबाईल ॲपला भेट देऊन ‘गो ग्रीन’ चा पर्याय निवडावा, असे आवाहन केले गेले आहे.