भंडारा : हिरकणी उद्योगाच्या नावे जिल्ह्यातील तब्बल ५,३०० महिलांना ३२ लाख ८६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनी संचालकांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली समन्वयकांच्या माध्यमातून प्रत्येक महिलेकडून ६२० रुपये गोळा करून फसवणूक करण्यात आली.

संचालिक सोनिका गाडेकर (५५, रा. जलमंदिराशेजारी फलटण, जि. सातारा), कंपनीचे संचालक दीपक चव्हाण (४०), विदर्भ प्रमुख प्रियंका कोकाटे (३०, रा. गांधीनगर बीड) आणि पल्लवी खोब्रागडे (२५, रा. लाखोरी रोड, लाखनी, जि. भंडारा), अशी आरोपींची नावे आहेत.

भंडारा शहरालगतच्या फुलमोगरा अशोकनगर येथील भागवत मेश्राम यांना त्यांची मैत्रीण लोकप्रिया देशभ्रतार हिने इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफार्म, व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली. त्याला हिरकणी व्यवसाय प्रशिक्षण व महिला उद्योग समूह महाराष्ट्र राज्याची असेल असे समजून मनीषा त्यात सहभागी झाली. ऑगस्ट २०२१ मध्ये या चौघांनी भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात समन्वयक पदाच्या मुलाखतीसाठी आमंत्रित केले. १२ हजार रुपये वेतन व ३ हजार रुपये प्रवासभत्ता देण्याचे ठरले. यावेळी २२ समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना महिला उद्योग समूहांना जोडण्याचे काम दिले. मनीषाने यादरम्यान ८५ महिलांना उद्योग समूहात जोडत प्रत्येकीकडून ६२० रुपये प्रशिक्षण शुल्क घेतले. ते ५२ हजार ७०० रुपये कंपनीच्या फोन पे आणि बँक खात्यात जमा केले. याचप्रमाणे इतर २१ समन्वयकांनीही महिलांकडून ६२० रुपये गोळा केले. त्यात तब्बल ५ हजार ३०० महिला सहभागी झाल्या. एकूण ३२ लाख ८६ हजार रुपये संबंधितांना पाठवण्यात आले.

परंतु काही दिवसांनंतर कोणत्याही महिलेला प्रशिक्षण आणि सामग्रीही उपलब्ध करून दिली नाही. महिलांनी समन्वयकांना भेटून साहित्याची मागणी केली. त्यावरून या समन्वयकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर दिलेला धनादेशही अनादरीत झाला. शेवटी मनीषा मेश्राम यांनी भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल. पुढील तपास ठाणेदार सुभाष बारस करीत आहेत.

लिंकमुळे फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनीषा मेश्राम यांना त्यांच्या मैत्रिणीने व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवली. ती लिंक राज्य शासनाची असल्याचे समजून ती त्यात सहभागी झाली. दरम्यान, हिरकणी कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांना आमिष देत समूहात सहभागी केले आणि त्यातूनच त्यांच्यासोबत इतर महिलांची फसवणूक झाली.