गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागात कोंबड्यांच्या झुंजी लावून सुरू असलेल्या अवैध जुगारावर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. रेगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा गरंजी टोला येथील जंगल परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल ९२ आरोपींना अटक करण्यात आले असून, ४४ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोंबड्यांचा बाजार भरवून जुगार खेळवला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. स्थानिक नागरिकांना यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत असल्याचीही माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व ठाण्यांना अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी धानोरा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जंगल परिसरात गस्त घातली.

जंगलात मोठ्या आवाजात गोंगाट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस पथकाने जवळ जाऊन पाहणी केली असता कोंबड्यांची झुंज लावून पैज लावण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांचे पथक पाहताच काही आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दक्षता घेत ९२ जुगारींना ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आहे. यात ४६ दुचाकी (अंदाजे किंमत १६ लाख १० हजार), पाच चारचाकी वाहने (२६ लाख), ३१ मोबाईल फोन (१ लाख ७० हजार), १४ कोंबडे (३,२००), लोखंडी काती (२५०) आणि रोख रक्कम ४२,९५० अशा मिळून तब्बल ४४ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींवर गुन्हे दाखल

या सर्व आरोपींविरुद्ध रेगडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(ब) तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० कलम ११(फ)(न) अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास रेगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल इंगळे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, सपोनि. विश्वास बागल, पोउपनि. ज्ञानेश्वर धुमाळ, पोउपनि. देवाजी कोवासे आणि त्यांच्या पथकाने ही धडक मोहीम यशस्वी केली.

अवैध धंद्यांविरोधात कारवाई

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही काळापासून मोकळ्या जागी जुगार खेळवणे, कोंबड्यांच्या झुंजीवर पैज लावणे अशा घटना वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणावर या अवैध खेळात गुंतत असून, कुटुंबाचे आर्थिक नुकसान होत आहे. पोलिसांकडून झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे अशा अवैध व्यवसायांवर निश्चितच आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. पोलिसांनीही अशा अवैध जुगार, सट्टासारख्या अवैध धंद्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.