चंद्रपूर: सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गडबोरी गावातील प्रशिल मानकर या सात वर्षांच्या मुलाला गुरूवारी रात्री बिबट्याने घरासमोरून उचलून नेले होते. जवळपास अकरा तासानंतर चिमुकल्याचा मृतदेह गावालगतच्या झुडपी जंगलात मिळाला. चिमुकल्याचा मृतदेह बघून आई, आजी आणि वडिलांनी हंबरडा फोडला. दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करणार नाही तोवर मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतल्याने गावात ग्रामस्थ विरूध्द वन विभाग अशी तणावाची स्थिती निर्माण होती. मात्र संतप्त ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी येथे दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले असून दोनशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे.
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावातील रहिवासी बबन मानकर यांचा प्रशील (८) हा दुसऱ्या वर्गात शिकणारा मुलगा गुरुवारी सायंकाळी ६.३० ते ६.४५ च्या सुमारास काका नंदू मानकर व सहा वर्षाच्या बहिणीसोबत गणपतीचे जेवण आटोपून घरी परत येत होता. यावेळी घराच्या अंगणात अचानक बिबट्याने प्रशीलवर हल्ला केला आणि त्याला फरफटत जंगलाकडे घेऊन गेला. या हल्ल्यात प्रशीलचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर, पोलीस आणि वनविभागाच्या पथकानी रात्रभर शोधमोहीम राबवली, मात्र प्रशीलचा शोध लागला नाही. त्यानंतर गावातील नागरिकांनीच पुढाकार घेऊन शोध मोहीम सुरू केली. आज शुक्रवार १९ सप्टेंबरच्या पहाटे ६ ते ६.३० वाजताच्या दरम्यान, घरापासून काही अंतर दूर असलेल्या हुडकी परिसरातील झुडपी जंगलात प्रशीलचा मृतदेह मिळाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट वनविभागालाच जबाबदार धरले आणि मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन दिवसांपासून गावात बिबट्याचे दर्शन होत होते आणि याबाबतची माहिती वारंवार वनविभागाला देण्यात आली होती. मात्र, वनविभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. लोकेश नंदनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नवरगाव येथील क्षेत्र सहायक उसेंडी यांना वन्यप्राण्यांच्या गावात येण्याबद्दल अनेकदा सांगितले होते. परंतु, उसेंडी यांनी उडवा उडवीची आणि उद्धट उत्तरे देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
१५ ते २० दिवसांपूर्वी गावात वाघ दिसल्याची माहिती दिली असता, “खरंच तो वाघ आहे का? त्याचा फोटो काढून पाठवा तेव्हा मी बघतो काय करायचं आहे,” असे बेजबाबदार उत्तर त्यांनी दिले होते, असा आरोप नंदनवार यांनी केला. दरम्यान सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकाळ बोरावार यांनी पोलीस अधिकारी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने बाजू ऐकूण घेत त्यांच्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करून समजूत काढत मृतदेह उचलण्याची मागणी केली. शेवटी कुटुंबाने शवविच्छेदनाला परवानगी दिली. सध्या शवविच्छेदन सुरू आहे. त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वन अधिकारी अंजली सायंकाळ यांनी दिली. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस विभागाने अतिरिक्त कुमक मागवून घेतली. घटनास्थळी ब्रह्मपुरी वन विभागाचे एसीएफ गायकवाड, तहसीलदार संदीप पानमंद, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोलीस उपअधीक्षक तथा मुलचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, सिंदेवाहीचे पोलीस कांचन पांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश मेश्राम, चंद्रकांत लांबट ठाणेदार तळोधी बाळापूर यांच्यासह पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.