वर्धा : फसवणूक केली म्हणून कोर्टात धाव घेतली जाते. पण आता तर चक्क कोर्टाचीच फसवणूक करण्यात आल्याने पोलीस तक्रार झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा, असा खोटा शिक्का आरोपी बाबाराव शेंडे याने तयार करीत सूचनापत्र बनविले. त्यावर न्यायालय सहाय्यक अधीक्षकांची बनावट स्वाक्षरी केली. ते पत्र मग पाकिटात टाकून पोस्टाने इतरांना पाठविल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. न्यायालयाने चौकशी केल्यावर हा फसवणूकीचा प्रकार उजेडात आला. जिल्हा व सत्र न्यायालयात ११ जुलै २०२२ रोजी एक प्रकरण पटलावर होते. मात्र न्यायाधीशांनी शरद खापर्डे व अन्य दोघांविरोधात नोटीस काढण्यासाठी आदेश दिलेला नव्हता. हे प्रकरण अर्जदाराच्या सुनावणीसाठी २८ जुलै २०२२ पर्यंत तहकूब करण्यात आले होते. तरीही आरोपी बाबाराव शेंडे याने संबंधित व्यक्तीविरोधात बनावट सूचनापत्र तयार केले.

हेही वाचा…अमरावती : दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या

ते पत्र सरकारी पाकिटात खोटा शिक्का मारून खापर्डे यास पाठविले. त्या पत्रात शरद खापर्डे याने न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांच्या समक्ष २८ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता हजर रहावे, असा खोटा व दिशाभूल करणारा मजकूर होता. तसेच नोटीस देण्याच्या तारखेत खाडाखोड करून शरद खापर्डे यांना दबावात आणण्याची ही बाब ठरली. बनावट शिक्के असल्याची बाब उजेडात आल्यावर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. त्यात आरोपीने सूचनापत्र, न्यायालयीन रबरी मोहर आदी बनावट तयार केल्याचे स्पष्ट झाले. या बनावट साहित्याचा उपयोग आरोपीने स्वतःच्या लाभासाठी केल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यायालयाने आरोपीविरोधात पोलीस तक्रार करण्याची सूचना केली. पोलीसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे शिक्के कोणी व कुठे तयार करवून दिले, हा आता तपासाचा मुद्दा ठरणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.