लोकसत्ता टीम नागपूर: राज्यात ३ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान विजेची मागणी सुमारे २८ हजार ‘मेगावॅट’पर्यंत गेली होती. परंतु राज्यातील बऱ्याच भागात वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसाने ही मागणी सुमारे एक हजार मेगावॅटने कमी झाली आहे. राज्याच्या बऱ्याच भागात ३ जूनला दुपारी ३ वाजता दरम्यान विजेची मागणी २८ हजार ‘मेगावॅट’च्या जवळपास होती. त्यापैकी १० हजार ३४५ ‘मेगावॅट’ वीज केंद्राच्या वाट्यातून राज्याला मिळत होती. तर ८ हजार १३७ ‘मेगावॅट’ वीज महानिर्मितीकडून मिळत होती. गेल्या एक- दोन दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात वादळीवाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे तापमानात घट झाली. हेही वाचा. पटोलेंच्या टीकेवर फडणवीस यांचे प्रत्युत्तर, म्हणाले ज्यांना टॉयलेटला…. परिणामी नागरिकांकडे वातानुकुलीत यंत्र, कुलर, कृषीपंपाचा वापर कमी झाल्यामुळे सोमवारी (५ जून) दुपारी ३.३० वाजता राज्यातील वीजेची मागणी कमी होऊन २६ हजार ८३० मेगावॅटवर आली. त्यापैकी ६ हजार ४४५ मेगावॅट वीज निर्मिती महानिर्मिती करत होती. तर केंद्राच्या वाट्यातून राज्याला १० हजार मेगावॅट वीज मिळत होती.