लोकसत्ता टीम

बुलढाणा : उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळावा आटोपून ते आनंदाने गावाकडे निघाले. गावापासून जेमतेम दोनेक तास अंतरावर असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडले. संभाजी नगर येथील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन महिला जागीच ठार झाली, तसेच तीन भाविक जखमी झाले असून त्यातील चालकाची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी संध्याकाळी उशिरा ही दुर्घटना घडली.

प्रयाग राज येथील कुंभमेळ्यातून हे प्रवासी परतीच्या मार्गाला लागले. आपल्या चारचाकी वाहनाने (कारने) आपले मूळगाव ( वडगाव कोल्हाटी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गाने परत जात होते. सांभाजी नगर दोनेक तासावर असताना समृद्धी महामार्गवरील मुंबई कोरीडोर वरील चॅनल क्रमांक तीनशे वीसजवळ कार चालकाला डुलकी लागली. कार अनियंत्रित होऊन साईड बॅरियरला धडकली. यामध्ये एक महिला जागीच ठार झाली तर तिघे जण जखमी झाले.

चालक अक्षय भगवान नराळे (वय २७ वर्ष राहणार वडगाव संभाजीनगर) याला डुलकी लागल्याने सदर कार अनियंत्रित होऊन फरफटत दोनदा उलटली. यामध्ये रूपाली भगवान नराळे (वय ४५ वर्ष) यांना गंभीर मार लागल्याने ह्या जागेवरच मरण पावल्या. भागवत देवीदास नराळे (वय ५५ वर्ष) हे गंभीर जखमी झाले. तसेच संजय खंडोबा पवार (वय ६५ वर्ष व मंगला संजय पवार वय ६० वर्ष (सर्व राहणार बजाज नगर वडगाव कोल्हाटी तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर) हे किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमीवर महामार्ग रुग्णवाहीका १०८ चे  डॉक्टर उज्वल तायडे व चालक प्रविण राठोड यांनी तात्काळ औषध उपचार केले.तसेच पुढील उपचारासाठी सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताची माहिती मिलताच महामार्ग पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत, पोलीस हवालदार संतोष वनवे, विष्णू गोलांडे, गोपाल गोरले व महामार्ग सुरक्षा बल चे जवान, जलद कृती दल घटना स्थळी दाखल झाले त्यांनी मृतक महिलेस अपघातग्रस्त कारच्या बाहेर काढून ॲम्बुलन्स द्वारे रवाना केले. अपघात ग्रस्त कार क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.