गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी नक्षल चळवळीचा मोठा नेता भूपती याने आपल्या ६० सहकाऱ्यांसह केलेल्या आत्मसमर्पणाच्या ऐतिहासिक घटनेनंतर आज छत्तीसगडमधील बस्तर येथे तब्बल २०० हून अधिक नक्षलवादी शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होणार आहेत. या घटनेमुळे मध्य भारतातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले असून, शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला मिळालेले हे आजवरचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक यश मानले जात आहे.
या आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये दंडकारण्य विभागीय समितीचा मोठा नेता रुपेश याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, गडचिरोलीत भूपतीने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याच्या या निर्णयाचे सर्वप्रथम जाहीर समर्थन करणारा नेता रुपेश हाच होता. रुपेशच्या या भूमिकेनंतर चळवळीत मोठी दुफळी निर्माण झाली होती आणि त्याचेच पर्यवसान आजच्या या महा-आत्मसमर्पणात झाले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री विजय शर्मा यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जगदलपूर येथील रिझर्व्ह पोलीस लाईन मैदानावर हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. राज्य शासनाने राबवलेल्या ‘शांती, संवाद आणि विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित व्यापक नक्षल निर्मूलन धोरणामुळेच हे शक्य झाल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. या धोरणामुळे निर्माण झालेल्या विश्वास आणि पुनर्वसनाच्या वातावरणामुळे अनेक कट्टर नक्षलवादी आता हिंसेचा मार्ग सोडण्यास तयार झाले आहेत.
दंडकारण्यात आत्मसमर्पणाची लाट
दोन दिवसांपूर्वी गडचिरोली पोलीस दलापुढे जहाल नक्षली नेता भूपती आपल्या ६० साथीदारांसह शरण आला होता. या घटनेने चळवळीच्या वैचारिक आणि लष्करी नेतृत्वाला मोठा धक्का दिला. त्यानंतर काही तासांतच दंडकारण्य विभागीय समितीचा नेता असलेल्या रुपेशने भूपतीच्या निर्णयाचे समर्थन करत, आपणही लवकरच असा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले होते. त्याच्या या भूमिकेमुळे नक्षलवादी गटांमध्ये खळबळ माजली होती.
अखेर, रुपेशने आपल्या २०० हून अधिक सहकाऱ्यांसह आज आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे गडचिरोली ते बस्तर या संपूर्ण दंडकारण्य पट्ट्यात नक्षलवाद्यांची मोठी हानी झाली आहे. या दोन मोठ्या घटनाक्रमांमुळे नक्षल चळवळीतील अंतर्गत मतभेद, नेतृत्वावरील अविश्वास आणि हिंसेच्या मार्गावरील निरर्थकता स्पष्टपणे समोर आली आहे. या ऐतिहासिक यशामुळे नक्षलवादाच्या समाप्तीच्या दिशेने एक मोठे आणि निर्णायक पाऊल उचलले गेले आहे, असे मानले जात आहे.