नागपूर: काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पार पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारतातून परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता व्यापाऱ्यांनीही पाकशी व्यापार बंद करण्याचे ठरवले आहे. कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापाऱ्यांच्या संघटनेने पाकिस्तान सोबत तातडीने व्यापार थांबण्याचा निर्णय घेतला आहे. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी ही माहिती नागपूर येथे माध्यमांशी बोलताना दिली.
कॅटच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच भुवनेश्वर येथे पार पडली, त्यात हा निर्णय सर्वानुमते घेतल्याचा दावा बी सी भरतीया यांनी केला आहे. भरतिया म्हणाले, संघटनेच्या निर्णयामुळे काही प्रमाणात भारतातील व्यापाऱ्यांनाही आर्थिक झळ पोहचेल. पण देशहितापुढे व्यापारी हीत मोठे नाही. त्यामुळे संघटनेचे सर्व सदस्य पाकिस्तान सोबतचा व्यापार थांबवणार आहेत. कॅटच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला साखर, सिमेंट, लोह पोलाद, ऑटोमोबाइल्स पार्ट, टायर ट्यूब अशा आदी वस्तूंची भारतातून होणारी निर्यात बंद होईल.
भारताला ही पाकिस्तान मधून येणाऱ्या सुक्या मेव्याला मुकावे लागेल,असे ही भरतीया म्हणाले. जोवर पाकिस्तानी व्यापारी आणि ग्राहक आपल्या सरकार वर दबाव आणून दहशतवादावर नियंत्रण आणण्यासाठी सांगत नाही, तोवर आम्ही पाकिस्तान सोबत व्यापार करणार नाही असे ही कॅटने जाहीर केले आहे.
कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ही व्यापाऱ्यांची सर्वात मोठ्या संघटना आहे. देशभरात या संघटनेशी लहान, मोठे असे एकूण ४० हजार व्यापारी जुळलेले आहेत.चिल्लर विक्रेत्यांची संख्या ९ कोटींहून अधिक आहे.