नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या शहरात महिला सुरक्षित आहेत, का असा सवाल उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला बजरंग दलाचा कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या मवाल्याच्या त्रासातून एका नामांकित एअरलाईन्स कंपनीत क्रू मेंबर असलेल्या तरुणीला नोकरी आणि करिअरवर पाणी सोडावे लागले आहे. हा मवाली विवाहित आहे. तरीही सातत्याने पाठलाग करून तो तिला त्रास देत आहे.
इतक्यावरच त्याचे धाडस थांबलेले नाही तर त्याने काही दिवसांपूर्वी तिला रस्त्यात गाठत धमकीही दिली. मी बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तूच काय तर पोलीस देखील माझे काही बिघडवू शकत नाहीत, असे धमकावत त्याने तिला त्रास दिला.
या प्रकरणात तरुणीने कळमना पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. विरसिंग अमरसिंग वर्मा असे या मवाल्याचे नाव आहे. घराजवळील ओळखीतल्या एका तरुणाच्या माध्यमातून तरुणीची २०१९ मध्ये विरसिंगसोबत ओळख झाली होती. या नंतर विरसिंगने तिला फेसबूक फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. फेसबूकवरून ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर २०२१ मध्ये विरसिंगचे लग्न झाले. मात्र लग्न होऊनही विरसिंग या तरुणीच्या संपर्कात होता. माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या होणाऱ्या पतीला आपल्यातले संबंध सांगू असे तो तिला सतत धमकावत होता.
काही दिवसांपूर्वी विरसिंगने तिला रस्त्यात अडवून धमकी देखील दिली. माझी ओळख वर पर्यंत आहे. मी तुझ्यासोबत काहीही करू शकतो. पोलिसही माझे काही बिघडवू शकत नाहीत, असे धमकावून त्याने तरुणीला त्रास देणे सुरू केले. या त्रासामुळे कंटाळलेल्या तरुणीने कळमना पोलिस ठाणे गाठत विरसिंग विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तोवर तरुणीने एअरलाईन्समधील नोकरीचा राजीनामा दिला. एका मवाल्याच्या त्रासामुळे नामांकित कंपनीत क्रू मेंबर असलेल्या या तरुणीला करीअरवर पाणी सोडावे लागले आहे.
विरसिंग वर्मा हा कार्यकर्ता बजरंग दलाचा नाही. आमच्या संघटनेशी त्याचा सुतरामही संबंध नाही. तरीही संबंधित तरुणीने कायदेशीर न्याय मागितल्यास संघटन निःश्पक्षपणे तिच्या पाठीशी उभे राहिल. कसल्याही असामाजिक कृत्याला संघटन पाठीशी घालणार नाही. – कमल हरियाणी, बजरंग दल, महानगर संयोजक.