नागपूर : भाजपची सत्ता असताना संघाचा प्रभाव अधोरेखित करण्याचे प्रयत्न नेहमीच भाजप नेत्यांच्या माध्यमातून केले जाते. केंद्राचा मंत्री आला की त्याची रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराची भेट ठरवली जाते. त्याचा प्रसार आणि प्रचारही व्यवस्थित केला जातो. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपुरात आलेले भाजपचे आमदार आणि मंत्री एकदिवस स्मृती मंदिराला भेट देऊ लागले . त्यानंतर भाजपच्याच नेतृत्वात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात भाजप आमदारांची स्मृती मंदिर भेटीची परंपरा कायम आहे.
२०२३ मध्ये महायुतीत अजित पवार यांचा समावेश झाला. त्यानंतर झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार स्मृती मंदिरात गेले, पण अजित पवार आणि त्यांचे आमदार, मंत्री तेथे गेले नव्हते. ३१ ऑगस्टला महायुतीचा महिला मेळावा नागपुरात झाला. यानिमित्ताने नागपुरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृती मंदिरात जाऊन डॉ.हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले, पण याच कार्यक्रमाला आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तेथे जाणे टाळले, असे त्यांनी आतापर्यंत दुसऱ्यांदा केले. ते दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी गेले होते हे येथे उल्लेखनीय.
हेही वाचा…चंद्रपुरातील पुरासाठी वेकोलि नव्हे महापालिका जबाबदार! वेकोलिचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेंव्हा धर्मनिरपेक्षता हा पक्षाचा मुळ पाया होता.या पक्षाने कधीही हिंदुत्ववादी पक्षाशी हातमिळवणी केली नाही. अजित पवार यांनी पक्षच पळवला,भाजपसोबत युती केली, पक्ष सत्तेत सहभागी झाला. पण अजित पवार हिंदुत्ववादी पक्षासोबत गेल्याने राष्ट्रवादीला मत देणारा धर्मनिरपेक्ष आणि गैर हिंदुत्ववादी मतदार अजित पवार यांच्यावर नाराज झाला. या शिवाय संघाची विचारसरणी आणि राष्ट्रवादीची विचार भिन्न आहेत.
हेही वाचा…वर्धा : पूल खचल्याने आजोबा व नात वाहून गेले; शोधमोहीम सुरू…
मनुवादाला राष्ट्रवादीचा विरोध आहे. म्हणून मागच्या अधिवेशन काळात राष्ट्रवादीचे आमदार संघ भूमीवर गेले नव्हते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना खुद्द बारामतीकरांनी नाकारले. पक्षापासून दलित,बहुजन आणि अन्य मतदारही दुरावला. अशा स्थितीत पुन्हा संघभूभीवर गेल्यास पक्षाचा पारंपारिक मतदार ( जो शरद पवार यांच्यासोबत आहेत) दुरावला जाईल,अशी भीती वाटल्याने पवार संघभूभीवर गेले नाही ,अशी चर्चा आहे. तसेच संघाच्या साप्ताहिक विवेक मधूनही अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवास अजित पवारच कारणीभूत असल्याची भावना निर्माण करण्यात आली. यामुळे राष्ट्रवादी संघांवर नाराज आहे. नेते उघडपणे बोलत नसले तरी संघाच्या व्यासपीठावर जाणे टाळले जात आहे. अजित पवार शनिवारी नागपुरात आल्यावर दीक्षाभूमीवर गेले होते हे येथे उल्लेखनीय.