नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) चिंतन शिबीर नागपुरात सुरू आहे. या शिबिरात दहा प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर नागपूर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, इंद्रनील नाईक, नबाव मलिक, सुनेत्रा पवार, चंद्रकांत पाटील यासह ५०० हून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत .
शिबिराच्या उदघाटन समारंभाप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला यावर पुन्हा स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सकारमध्ये आपण सहयोगी आहोत. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जाण्याचे पाऊल का टाकले. वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांमधील वेदना का स्वीकारल्या, असे अनेक प्रश्न लोक मला विचारतात. मी तुम्हाला मनापासून सांगतो, सत्ता किंवा पदाकरिता उचलेले हे पाऊल नाही. महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे. या आमच्या अंत:करणातील हाकेला आम्ही ओ दिली आणि हा मार्ग स्वीकारला.
हे शिबीर एम्प्रेस पॅलेस, वर्धा रोड येथे सुरू आहे. या शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बूथ रचना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर विचारमंथन केले जात आहे. पक्षाची आजवरची आणि भविष्यातील वाटचाल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील यश यावर सखोल चर्चा सुरू आहे.
या चिंतन शिबिरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीचा आढावा घेण्यात येईल. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आगामी निवडणुकांमध्ये यश कसे मिळवायचे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
या मुद्यांवर चिंतन
युवकांचे बदलते आकांक्षा आणि जीवनशैली, समाजातील विविध घटकांच्या अपेक्षा, तंत्रज्ञान आणि समाज यांचा परस्पर संबंध, शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, आत्मनिर्भरता, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कामगार वर्गाचे हित, पक्षाची विचारसरणी गावागावात पोहोचवण्याचे धोरण, या शिबिरात पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आजी-माजी आमदार व खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सहभागी होणार आहेत. हे शिबीर शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित प्रगत महाराष्ट्र घडवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.