अकोला : ‘वंदे मातरम् गीत गाण्यात ज्यांना लाज वाटत असेल त्यांनी खरं तर देश सोडून जायला पाहिजे. या देशाचे खायचे, इथे मोठे व्हायचे आणि वंदे मातरम् गीताला विरोध करायचा, गीत गाण्यास असमर्थता दाखवयाची, त्यांनी या देशातच राहू नये,’ असे विधान राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले. ‘वंदे मातरम्’ गीताला विरोध करणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले.

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपने शुक्रवारी देशभर १५० ठिकाणी कार्यक्रम घेतला. राज्यात १५ ठिकाणी भाजपकडून ‘वंदे मातरम्’ गायनाचा कार्यक्रम झाला. अकोल्यातील कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ॲड. आकाश फुंडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ॲड. फुंडकर यांनी शेलक्या भाषेत विरोधकांचा समाचार घेतला.

ते म्हणाले, ‘वंदे मातरम्’ असे गीत आहे, ज्यामुळे देश स्वतंत्र झाला. १८७५ मध्ये हे गीत लिहिल्या गेले. आता आपण २०२५ मध्येही हे गीत गात आहोत. हे अमर झालेले शब्द आहेत. हे गीत गाण्यास ज्यांना लाज वाटत असेल किंवा कमीपणा वाटत असेल तर त्यांनी देश सोडून जायला पाहिजे. या गीताला विरोध करणाऱ्यांनी देशातच राहू नये.

मौलाना अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह मुस्लीम व इतर समाजातील सर्व स्वातंत्र्य सेनानींनी ‘वंदे मातरम्’ गीत गायले आहे. ‘वंदे मातरम्’ गीताचे शब्द अमर झाले, त्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. याचेच फळ हे लोक चाखत आहेत. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ गीत म्हटले पाहिजे, नाही तर देश सोडला पाहिजे.’

‘समभागधारक कंपनी चालवत नसतो’; पार्थ पवार प्रकारणात अप्रत्यक्षरित्या पाठराखण

कंपनीचे समभागधारक असणे वेगळे असतात. रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीचे लाखो समभागधारक असतात. कंपनीत काही गैरव्यवहार झाले तर सर्वच समभागधारक दोषी ठरणार नाही. समभागधारक कंपनी चालवत नसतात. कंपनीत निर्णय घेणारे दोषी असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

चौकशीअंती जो कोणी दोषी आढळणार त्यांच्यावर कारवाई होणार आहे. ती सरकारी जमीन लाटली असेल तर ती जमीन देखील परत घेतल्या जाईल व सर्व दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे ॲड. आकाश फुंडकर म्हणाले. पार्थ पवार प्रकरणावर त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाठराखण केली.