नागपूर : फेब्रुवारीमध्ये दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक सावरकरप्रेमींनी साहित्य महामंडळ व आयोजकांकडे केली होती. या मागणीची अखेर दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

२१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी साहित्य महामंडळ, महामंडळाच्या घटक संस्था व सरहद या आयोजक संस्थेची संयुक्त बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी संमेलनात सावरकर यांचे नाव देण्याबाबत सावरकरप्रेमींनी विविध माध्यमातून आयोजक व महामंडळाकडे केलेल्या मागणीवर सर्वंकष चर्चा झाली. चर्चेअंती असे ठरले की, तालकटोरा मैदानावरील जे मुख्य प्रवेशद्वार असेल त्याला लोकमान्य टिळकांचे नाव देण्यात येईल व मैदानाच्या आत ‘व्हीआयपी’ प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर असे नाव देण्यात येईल.

हेही वाचा : संघाचे आता कुटुंब प्रबोधनावर लक्ष

मंचावरील बैठक व्यवस्थेसाठी पर्याय

संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी महामंडळ, घटक संस्था, आयोजक संस्थांचे पदाधिकारी मिळून एकूण २८ जण मंचावर असतात. परंतु, दिल्लीतील संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार असल्याने त्यांची सुरक्षा यंत्रणा इतक्या लोकांना मंचावर प्रवेशास परवानगी देणे कठीण आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, महामंडळाचे चार, घटक संस्थांचे तीन व आयोजक संस्थेचे तीन पदाधिकारी मंचावर असतील. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे प्रमुख अतिथी असतील.

हेही वाचा : नितीन गडकरी म्हणतात… ४० टक्के वायू प्रदुषणाला आमचेच मंत्रालय जबाबदार

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक प्रेरक काव्ये लिहिली, समाजाला दिशा दाखवणारी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. शिवाय ते स्वत: साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याचा विचार आधीच झाला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. – उज्ज्वला मेहेंदळे, कार्यवाह, साहित्य महामंडळ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी भुजबळांकडून प्रस्ताव नामंजूर

नाशिक येथे पार पडलेल्या ९४ व्या साहित्य संमेलनात सावरकर यांचे चरित्र, कथा, कादंबऱ्यांचा समावेश करावा व प्रवेशद्वार अथवा व्यासपीठाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी या संदर्भातील प्रस्ताव फेटाळून लावला होता.