अकोला : मागासवर्गीयांसाठी राखीव मंजूर दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवल्या प्रकरणी दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने स्थगनादेश दिला. जिल्हाधिकाऱ्यांना याचिकेत नमूद सर्व मुद्द्यांवर शपथपत्र दाखल करण्यास आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची माहिती वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत सत्र २०२४-२०२५ च्या दलित वस्तीचा निधी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीने सप्टेंबर २०२४ मध्ये नियमाप्रमाणे मंजूर केला होता. निधी वितरित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिला. मात्र, ३१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचे दोन इतिवृत्त तयार करून मागासवर्गीयांसाठी राखीव मंजूर दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवला. याविरूद्ध माजी समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे आणि काही सरपंचांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, असे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका क्र.२४०३/२०२५ ची सुनावणी घेत ५ मे रोजी या प्रकरणी हस्तांतरित झालेल्या निधी वितरणाला स्थगनादेश दिला असून जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात याचिकेत नमूद सर्व मुद्द्यांवर शपथपत्र दाखल करण्यास निर्देश दिले आहेत, असे वंचितचे पदाधिकारी म्हणाले.

एकाच बैठकीचे दोन वेगवेगळे इतिवृत्त तयार करणे, नियमानुसार प्रस्ताव असतांना देखील त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला निधी इतर प्रयोजनासाठी बेकायदेशीरपणे वळवणे अशा अनेक मुद्द्यांवर याचिका दाखल आहे. ज्या उद्देशासाठी मागासवर्गीयांसाठी सरकारकडून निधी आला आहे, तो दुसरीकडे वळवणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेत प्रतिवादी म्हणून पालकमंत्री अकोला, सचिव समाजकल्याण विभाग मंत्रालय मुंबई, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग अकोला, जिल्हाधिकारी अकोला, सचिव जिल्हा नियोजन समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला, कृषी विकास अधिकारी जि.प. अकोला यांना केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचिकाकर्त्यांच्यावतीने उच्च न्यायालयात ॲड. आनंद देशपांडे यांनी बाजू मांडली. पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय सदस्य अरुंधती सिरसाठ, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडी अध्यक्ष व माजी समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, माजी गट नेता ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, विकास सदांशिव, पराग गवई, अविनाश खंडारे आदी उपस्थित होते.