अकोला : लोकसभा निवडणुकीत महायुतीने प्रचार मोहीम सुरू केली असतांनाही महाविकास आघाडीतील वंचितचा समावेशाचा मुद्दा रेंगाळला आहे. ‘मविआ’ व वंचितमध्ये आघाडी होण्याचे घोडे अडले. हा प्रश्न अधांतरी लटकल्याने अकोला मतदारसंघातील लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसची देखील कोंडी होतांना दिसत आहे. आघाडीचा मुद्दा स्पष्ट होईपर्यंत काँग्रेसला उमेदवार जाहीर करण्याची प्रतीक्षाच करावी लागण्याचे चित्र आहे. आघाडी न झाल्यास परंपरेनुसार अकोल्यात पुन्हा एकदा तिरंगी लढतीचे संकेत आहेत.
जातीय राजकारण व मतविभाजनावर निवडणुकीचे गणित असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात वेगळा ठरतो. १९८९ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अकोला मतदारसंघाची ओळख होती. मात्र, काँग्रेसच्या या गडाला भाजपने सुरूंग लावला अन् गत साडेतीन दशकात काँग्रेसचा उमेदवार येथून निवडून येऊ शकला नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढणे भाजपच्या पथ्यावर पडत गेले. त्यामुळे गत काही वर्षांमध्ये काँग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर अकोल्यात समीकरण ठरते. मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधण्याची महाविकास आघाडीची रणनीती आहे. ॲड. आंबेडकर यांना ‘मविआ’मध्ये घेण्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. ॲड. आंबेडकरांनीही ‘मविआ’मध्ये येण्याची तयारी दर्शवून काही मुद्दे मांडले. जागा वाटवाचा तिढा आहे. त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. आता ॲड. प्रकाश आंबेडकरांनी २६ मार्चपर्यंत आघाडीसाठी ‘डेडलाईन’ दिली. आघाडी झाल्यास अकोल्याची जागा ॲड. आंबेडकरांसाठी सोडावी लागेल. त्यांनी अगोदरच येथून स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. ‘मविआ’मध्ये वंचितचा समावेश न झाल्यास अकोल्यात सक्षम उमेदवार देण्याचे आव्हान काँग्रेसपुढे राहणार आहे. आघाडी संदर्भातील अंतिम निर्णय होईपर्यंत काँग्रेस अकोल्यात उमेदवार जाहीर करू शकत नसल्याची स्थिती आहे. पक्षाने अगोदरच उमेदवार जाहीर केल्यास काँग्रेसच ॲड. प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करण्यास इच्छूक नसल्याचा संदेश जनमानसात जाऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसने सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतल्याचे चित्र आहे.
अकोल्यात काँग्रेसने आतापर्यंत मराठा, मुस्लीम व माळी कार्ड वापरले आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेस मराठा उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. अकोल्यात काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांचे नाव अग्रक्रमावर घेतले जात आहे. २०१९ मध्येही ते इच्छूक होते. गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठींच्या माध्यमातून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. अकोल्याचे समीकरण २६ मार्चनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
…तर ॲड. आंबेडकरांना पाठिंबा?
‘मविआ’ व वंचितमध्ये आघाडी होण्याचा मुद्दा ताणल्या जात आहे. त्यातच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘गुगली’ टाकून काँग्रेसच्या राज्यातील सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षांना पाठवला. कोल्हापूर येथून काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केल्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांनी त्यांना वंचित आघाडीचा पाठिंबा दिला आहे. ‘मविआ’ व वंचितमध्ये आघाडी होण्याची शक्यता धूसर झाल्यात जमा आहे. अकोल्यात तिरंगी लढतीत काँग्रेसचा उमेदवार विजयी होत नसल्याचा गत साडेतीन दशकातील इतिहास आहे. राज्यातील दलित मतपेढीला आकर्षित करण्यासाठी अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांना बिनशर्त पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस खेळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्या दृष्टीने काँग्रेसमध्ये चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.
