अकोला : जिल्ह्यातील कुरणखेड येथील रहिवासी सैन्य दलातील जवानाला अयोध्या येथे वीरमरण आले. कर्तव्यावर असतानाच विजेचा जोरदार धक्का बसल्याने जवान नितेश घाटे यांचा मृत्यू झाला. वीर जवानाचे पार्थिक कुरणखेड येथे आणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘वीर जवान, अमर रहे…’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. यावेळी भावविभोर वातावरणात चिमुकलीसह सर्वांचेच डोळे पाणावले होते.

अकोला जिल्ह्यातील विविध गावातून जवान सैन्य दलात कार्यरत आहेत. देशाच्या विविध भागात ते आपले सेवा देत असतात. जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या कुरणखेड गावातून अनेक जवान सैन्य दलात भरती झाले. देशाच्या सीमेसह विविध भागात आपली सेवा देतात. कुरणखेड हे सैनिकांचे गाव म्हणून त्याची ख्याती झाली. कुरणखेड गावाची भूमी शहीद सैनिकांसोबतच आजी-माजी सैनिकांच्या नावाने प्रसिद्ध आहे. गावातून सैन्य दलात दाखल होण्याची परंपरा निरंतर चालत आली. दरम्यान, कुरणखेड येथील आणखी एका सैनिकाला कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. कुरणखेड येथील नितेश घाटे यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले.

भारतीय सैन्य दलाच्या पुलगाव अंतर्गत येत असलेल्या अकोला जिल्ह्यातील कुरणखेड गावातील नितेश मधुकर घाटे हे गेल्या पंधरा वर्षापासून सैन्यात मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. निलेश घाटे यांची गेल्या काही दिवसापासून अयोध्या येथे सेवा सुरू होती. आपल्या कर्तव्यावर असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. वीर जवानाचे पार्थिव कुरणखेड येथे आणण्यात आले. यावेळी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, सैन्य दलाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. वीर जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटे परिवारातील मोठ्या मुलाचा देखील अपघाती मृत्यू

कुरणखेड येथील शेतकरी मधुकर घाटे हे अनेक वर्षांपासून शेती करून संसार चालवत आहेत. त्यांनी आपल्या तीन मुलांना शिकवले. एक मुलगा शेतकरी आहे, तर मोठा मुलगा संदीप घाटे हे सुद्धा भारतीय सैन्य दलात सेवा बजावत होते. सेवा संपल्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्या घटनेवर काही वर्ष उलटल्यानंतर काल लहान मुलगा नितेश घाटे यांना सुद्धा आपल्या कर्तव्यावर असताना अयोध्या येथे विजेचा जोरदार धक्का बसून वीरमरण आले. या दुर्दैवी घटनांमुळे घाटे परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.