अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा येवा वाढला असून धरणाचे तेराही वक्रद्वार मंगळवारी सकाळी खुले झाले. धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाने वर्धा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ झाली.

अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा ९५.९५ टक्क्यांवर पोहचला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. अप्पर वर्धा धरणातील पाण्याचा येवा वाढल्याने आज सकाळी धरणाचे सर्व १३ दरवाजे ५५ सेंटिमीटरने खुले करण्यात आले. यातून ११५१.५१ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे.

अप्पर वर्धा धरणाचे पाणलोट क्षेत्र हे मध्य प्रदेशात आहे. या पाणलोट क्षेत्रात केल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे मध्य प्रदेशातील जाम आणि माडू नदीला पूर आला आहे. पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता तसेच येणाऱ्या येव्यानुसार जलाशय प्रचलन सूची नुसार विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

गेल्या २८ रोजी ऑगस्ट रोजी पाण्याच्या साठ्याची टक्केवारी ९१.७५ टक्के एवढी होती. त्यावेळी अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ९ दरवाजे उघडण्यात आले होते. आता सर्व १३ दरवाजे खुले करण्यात आले आहेत. हे विहंगम दृश्य बघण्यासाठी व पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी पर्यटकांनी अप्पर वर्धा धरण परिसरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. त्यादृष्टीने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी अप्पर वर्धा धरणाची १३ पैकी ३ दरवाजे ५ ऑगस्ट रोजी खुली करण्यात आली होती. त्यानंतर पाण्याचा पाहून १४ ऑगस्ट रोजी १३ पैकी ११ वक्रद्वार उघडण्यात आले होती ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक रोषनाईने पर्यटकांच्या डोळ्यात भुरळ घातली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे अप्पर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यास यंदा विलंब झाला आहे.

२७ प्रकल्पांतून विसर्ग

अमरावती विभागात ९ मोठ्या प्रकल्पांपैकी सात प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात येत आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पूस, अरूणावती, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान, पेनटाकळी, खडकपूर्णा या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय २७ मध्यम प्रकल्पांपैकी २० प्रकल्पांमधून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.