लोकसत्‍ता टीम

अमरावती : माजी मुख्‍यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्‍हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या विकासात्‍मक कार्यामुळे प्रभावित झाले आहेत. ते गेल्‍या अनेक दिवसांपासून भाजपच्‍या संपर्कात होते. त्‍यांनी विधानसभा सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिलाच, पण त्‍यांच्‍या सोबत १० ते ११ काँग्रेसचे आमदार देखील भाजपमध्‍ये प्रवेश करतील, असा दावा बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.

प्रसार माध्‍यमांशी बोलताना रवी राणा यांनी अमरावती जिल्‍ह्यातील तिवसाच्‍या आमदार यशोमती ठाकूर या देखील भाजपमध्‍ये प्रवेश करतील, असे भाकित वर्तवले, पण यशोमती ठाकूर यांनी त्‍यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना राणा वायफळ बडबड करतात, त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यात काहीही अर्थ नाही. आम्‍ही जेथे आहोत, तेथेच आहोत. भाजपमध्‍ये जाण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. काँग्रेसची सर्वधर्मसमभावाची विचारसरणी आम्‍ही सोडणार नाही, असा दावा केला.

आणखी वाचा-“राजीनामा धक्कादायक! चव्हाणांच्या मागे चौकशीचा फेरा पण नेमकं…”, विजय वडेट्टीवार म्हणाले…

राणा म्‍हणाले, अशोक चव्‍हाण हे गेल्‍या अनेक दिवसांपासून भाजपच्‍या संपर्कात होते. देशात आणि राज्‍यात ज्‍या पद्धतीने विकासाची गंगा अवतरली आहे, त्‍यामुळे अशोक चव्‍हाण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता पाहून प्रभावित झाले आहेत. त्‍यांच्‍यासोबत इतर १० ते ११ काँग्रेसचे आमदार संपर्कात आहेत. त्‍यांचा भाजप प्रवेश झाल्‍यानंतर काँग्रेसला मोठा धक्‍का बसणार आहे. येत्‍या काळात महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपच्‍या वाटेवर दिसतील, असा दावा रवी राणा यांनी केला.

रवी राणा यांनी माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या विरोधात सातत्‍याने टीका केली आहे. अशोक चव्‍हाण यांच्या राजीनाम्‍यानंतर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्‍यावर टीकेची संधी सोडली नाही. येत्‍या काळात शिवसेना उद्धव ठाकरे गटात स्‍वत: उद्धव ठाकरे, आदित्‍य ठाकरे आणि संजय राऊत हे तिघेच शिल्‍लक दिसतील. ठाकरे गटातील अनेक आमदार हे महायुतीत येण्‍यास इच्‍छुक आहेत, असाही दावा रवी राणा यांनी केला.