नागपूर : पूर्व विदर्भात प्रचारासाठी येणारे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा सहा एप्रिलचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान आहे. त्यासाठी या भागात अमित शहा प्रचाराला येणार होते. ६ एप्रिलला त्यांची गोंदिया येथे सभा आयोजित करण्यात आली होती. येथे सुनील मेंढे हे भाजपचे विद्यमान खासदार निवडणूक लढवत आहे.

दिल्लीहून नागपूरला येऊन शहा हेलिकॉप्टरने ते गोंदियाला जाणार होते. सभेची तयारी पूर्ण झाली होती. पण ऐनवेळी ही सभा रद्द झाल्याची माहिती आहे. दौरा रद्द होण्याचे कारण मात्र कळू शकले नाही. मात्र प्रकृतीच्या कारणावरून शहा यांनी दौरा रद्द केल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा…निवडणुकीत ‘लक्ष्मी’ स्वीकारा आणि मतदान करा, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या भागात प्रचारासाठी येणार आहे. त्यांची ८ एप्रिलला चंद्रपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहे. पूर्वी यासाठी १० एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती. पण आता मोदी १४ एप्रिलला येणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा…वंचितला काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

पूर्व विदर्भातील पाचही जागा महायुतीने प्रतिष्ठेच्या केल्या आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पाच पैकी तीन तर शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. चंद्रपूर येथून भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर अशी लढत आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधीही पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून त्यासाठी काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे.