अकोला : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन आमदारांमधील मतभिन्नता समोर आली आहे. त्यावरून अंतर्गत वादाला तोंड फुटले. आ. अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर पोस्ट टाकत ‘ऐसा क्यू करतो हो भाई?’ अशा शब्दात आ. संग्राम जगताप यांना नाव न घेता टोला लगावला. मुंबई येथील मुस्लिमांच्या दुकानातून फटाके खरेदी करणाऱ्यांच्या गर्दीची चित्रफित अमोल मिटकरी यांनी प्रसारित केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीची खरेदी केवळ हिंदुंच्या दुकानातूनच करण्याचे जाहीर आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात वाद झाला. राष्ट्रवादी अंतर्गतच तीव्र मतभेद झाले. संग्राम जगताप यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार संग्राम जगताप यांना नाव न घेता डिवचले आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी ‘एक्स’ खात्यावर मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये मुस्लीम दुकानदारांकडून दिवाळीचे फटाके खरेदी करणाऱ्या नागरिकांची चित्रफित प्रसारित केली आहे. ‘आमदार साहेबांचं जास्त मनावर न घेता हिंदू बांधवांनी केली तुफान गर्दी’, अशा शब्दांत त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला. ‘मुंबई क्रॉपर्ड मार्केट येथे मुस्लीम दुकानदारांकडून दिवाळीचे फटाके खरेदी करण्यासाठी आमदार साहेबांचे जास्त मनावर न घेता हिंदु बांधवांनी केलेली तुफान गर्दी. दोन किलोमीटरपर्यंत रांगच रांग… ऐसा क्यू करते हो भाई?’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
महायुती सरकारमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष सहभागी झाला. या प्रकरणी अजित पवार यांनी पक्षाची विचारधारा बदलली नसून आजही पुरोगामी विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालतो, असे स्पष्ट केले. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हिंदुत्वाचा पुरस्कार करताना सर्वत्र दिसून येत आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून राज्यात मोठा वाद झाला. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनीच स्वपक्षीय आमदारावर समाज माध्यमातून टिकास्त्र सोडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमधील मतभिन्नता, वाद, टिका, टिप्पणी यावरून राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे.