अमरावती : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळताना बैठक घेताहेत. हे शेतकऱ्यांचे दुर्देव आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती गठित केलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. कृषीमंत्र्यांची ही आठवी, नववी चूक आहे. यांच्याकडून आता काय अपेक्षा करणार, असा संतप्त सवाल माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली. बच्चू कडू म्हणाले, विवाह समारंभावर होणारा खर्च आणि मद्यपान केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, असे एकीकडे सरकारमधील लोक म्हणतात. पण, आमचे कृषीमंत्रीच जर रमीत गुंग होत असतील, तर शेतकऱ्यांचे काय भले होणार आहे. शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा हैदोस सहन करावा लागत आहे. उभे पीक उध्वस्त होताना शेतकऱ्यांना पहावे लागत आहे.
शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा स्थितीत तांत्रिक बाबींमध्ये अधिक न अडकता सरळ-सरळ कर्जमाफी करा आणि त्यानंतर उपाययोजना करा, असा आमचा सरकारला सल्ला आहे. शेतकरी सलाईनवर आहे, तो खरे तर ‘आयसीयू’मध्ये आहे. आता शेतकऱ्यांना तातडीच्या उपचारांची गरज आहे. पण, आता तुम्ही उपाययोजना शोधू, नंतर कर्जमाफीचा विचार करू, असे सांगत आहात. जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही, तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
जोपर्यंत कर्जमाफीसाठी ठोस भूमिका घेतली जात नाही, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. बच्चू कडू यांनी येत्या २४ जुलैला राज्यभरात ‘चक्काजाम’ आंदोलनाची घोषणा केली आहे.
कर्जमाफीसाठी सरकारने समिती नेमली असली, तरी त्यातून कोणताही अर्थबोध होत नाही. समिती ही कर्जमाफीसाठी आहे की उपाययोजनांसाठी, हेच कळत नाही. त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस भूमिका घेतली जात नाही, कर्जमाफीची तारीख सांगितली जात नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि इतर अनेक पक्षांनी तसेच विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.