अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांला एकरी ५० हजार रुपये मदत द्या, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, पंचवटी चौकात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी भाजपचे पदाधिकारी जमले होते. यावेळी उभय पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती, पण ताफा तेथून वेगाने निघून गेल्याने मोर्चेकऱ्यांनी सोबत आणलेल्या सोयाबीन, तुरीच्या पेंड्या वाहनांच्या दिशेने फेकल्या. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या सूचनेनुसार आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.

डॉ. राजीव ठाकूर, प्रवीण मोरे, हरीश मोरे, श्याम देशमुख आदींच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून झाली. दरम्यान याचवेळी चौकाच्या दुसऱ्या बाजूला भाजपचे अनेक कार्यकर्ते भगवे फेटे बांधून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी एकत्र झाले होते. दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

रवींद्र चव्हाण चौकात पोहचल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले, त्यानंतर चव्हाण यांच्या वाहनांचा ताफा कठोरा मार्गाकडे रवाना झाला. चव्हाण यांनी मोर्चेकऱ्यांशी काही वेळ बोलावे, अशी अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती, पण त्यांचा ताफा पुढे निघून गेला.

काही कार्यकर्ते हे वाहनाच्या दिशेने धावले. पोलिसांनी त्यांना रोखले. त्यावेळी काही मोर्चेकऱ्यांनी सोबत आणलेल्या सोयाबीनच्या पेंड्या वाहनांच्या दिशेने फेकल्या. यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

एकीकडे, अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झालेला असताना भाजपचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताचे सोहळे आयोजित करून जल्लोष साजरा करीत आहेत, ही बाब खेदजनक असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

मोर्चात किशोर चांगोले, सुकूमार खंडारे, शैलेश काळबांडे, गजानन राठोड, भागवत खांडे, मनोज अंबाडकर, प्रमोद तसरे, गजानन देशमुख, चेतन जवंजाळ, संजय नागोने, वीरेंद्र जाधव. अभय देशमुख, विलास गायकवाड, पंकज देशमुख, श्रीकांत बोंडे, शिल्पा महल्ले, सुजाता तिडके, ज्योती ठाकूर, रणजीत तिडके, शैलेश गवई, अविनाश गावंडे आदी सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचल्यानंतर तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले.