अमरावती : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या मेळाव्‍यात बोलताना ‘एनडीए’तील घटक पक्षांना कुठल्‍याही परिस्थितीत एका स्‍टेजवर आणू अशा वल्‍गना केल्‍या, त्‍या चुकीच्‍या आहेत. शिवसेनेची भाजपसोबत युती आहे. युवा स्‍वाभिमान पक्षासोबत नाही. महायुतीतील वातावरण दुषित करण्‍याचा राणा दाम्‍पत्‍याचा प्रयत्‍न आहे. भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी त्‍यांचे कान खेचून गप्‍प बसवावे, अन्‍यथा आम्‍हालाही कडक भूमिका घ्‍यावी लागेल, असा इशारा शिवसेनेच्‍या एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी दिला आहे.

आपल्‍या निवेदनात अडसूळ यांनी राणा दाम्‍पत्‍यावर टीका केली आहे. अडसूळ म्‍हणाले, नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्राचा निकाल लवकरच येणार आहे. देशातील कोट्यवधी लोकांचा विश्‍वास हा सर्वोच्‍च न्‍यायालयावर आहे. पण, राणा दाम्‍पत्‍याने मेळाव्‍याच्‍या माध्‍यमातून सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालाला आम्‍ही भीक घालत नाही, असे दर्शविण्‍याचा प्रयत्‍न केला. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निकाल हा आमच्‍याच बाजूने आहे, असे सांगून त्‍यांनी एका प्रकारे चुकीचा संदेश दिला आहे. त्‍याचा नकारात्‍मक परिणाम आगामी काळात दिसून येणार आहे, हे भाजपच्‍या नेत्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे.

हेही वाचा…‘पिंक बूथ’ केंद्र: लोकसभा निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्‍यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील अडसूळ यांनी केली आहे. शिवसेनेच्‍या एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीच्‍या जागेवर दावा केला आहे. ही जागा शिवसेनेची आहे. आम्‍हालाच उमेदवारी मिळेल, असे अडसूळ यांचे म्‍हणणे आहे. नवनीत राणा यांचा प्रचार करण्‍यापेक्षा राजकारणातून संन्‍यास घेऊ, असा इशाराच अडसूळ यांनी दिला होता. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ हे देखील उमेदवारीसाठी इच्‍छूक आहेत. त्‍यांनी नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला थेट विरोध दर्शविला आहे. महायुतीत त्‍यामुळे पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा…रुग्णाला स्ट्रेचरवर लावले व्हेंटिलेटर, रुग्ण पाच तासांपूर्वीच दगावला; तरीही डॉक्टरांनी…

दरम्‍यान शनिवारी युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या मेळावा पार पडला. भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांकडून नवनीत राणा यांना कुठल्‍याही प्रकारचा प्रस्‍ताव आल्‍यास त्‍याला पक्ष पूर्णपणे पाठिंबा देईल, असा ठराव युवा स्‍वाभिमान पक्षाने पारीत केला. घटक पक्षातील नेत्‍यांनी विरोधात काम केल्‍यास कारवाई करण्‍यास सांगू, असा इशारा रवी राणांनी स्‍थानिक नेत्‍यांना दिला, त्‍यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.