अमरावती : अमरावतीकरांना कोकणातील गडकिल्ले बघता यावेत यासाठी मध्य रेल्वेने धारातीर्थ गडकोट मोहीम २०२५ च्या निमित्ताने अनारक्षित विशेष रेल्वेची सोय केली असून, ही विशेष रेल्वे गाडी ६ फेब्रुवारीला नवी अमरावती रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.३० वाजता रवाना होईल. त्याचप्रमाणे ११ फेब्रुवारीला वीर स्थानकावरून रात्री १० वाजता अमरावतीकडे प्रस्थान करेल. त्यामुळे मधल्या चार दिवसांत अमरावतीकर पर्यटकांना रायगड, अलिबाग, मुरूड जंजिरा, सिंधुदुर्ग असे किल्ले बघता येतील. या विशेष रेल्वेचे प्रतिव्यक्ती अनारक्षित तिकीट २५० रुपये आहे. ही विशेष ट्रेन जाणे-येणे अशा दोनच फेऱ्या करणार आहे.

०११०१ क्रमांकाची विशेष गाडी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नवी अमरावती अकोली रेल्वे स्थानकाहून प्रस्थान करणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता वीर स्थानकावर पोहोचेल. यादरम्यान ही गाडी बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल व रोहा या स्थानकावर थांबा घेईल.

गाडी क्र. ०११०२ ही ११ फेब्रुवारीला रात्री १० वाजता वीर स्थानकावरून निघून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता नवी अमरावती अकोली स्थानकावर पोहोचेल. मार्गात ती रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा हे थांबे घेईल.

१६ सामान्य द्वितीय श्रेणी व २ सेकंड सिटींग चेअर कारसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी या विशेष रेल्वेची संरचना आहे. या गाडीचा लाभ अमरावतीकर शिवप्रेमी, पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेद्वारे करण्यात आले. या गाडीमुळे अमरावतीकर प्रवाशांना राज्यात विविध ठिकाणी जाण्यासाठी अतिरिक्त व स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे. सोबतच छत्रपती शिवरायांनी राज्यात उभारलेले गडकिल्लेही बघता येणार आहेत. बहुतांश गडकिल्ले हे कोकणात आहेत. त्यामुळे ही गाडी वीर स्थानकापर्यंत चालवली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धारातीर्थ गडकोट मोहिमेच्या निमित्ताने कोकणात थेट जाऊन किल्ले बघण्याची अमरावतीकर पर्यटकांना संधी मिळाली आहे. अमरावतीहून विविध प्रसंगी अशा विशेष रेल्‍वे चालवल्या जात आहेत. त्यामुळे पर्यटकांना विविध ठिकाणी कमी खर्चात जाणे शक्य होत आहे, अशी माहिती रेल्‍वे प्रशासनाकडून देण्‍यात आली आहे. या संधीचा पर्यटकांनी, दूर्गप्रेमींनी लाभ घ्‍यावा, असेही आवाहन करण्‍यात आले आहे.