अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी आमची मागणी आहे. बच्चू कडू हे गेल्या पाच दिवसांपासून त्यासाठी उपोषण करीत आहेत. पण, सरकारने अजूनही आमच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. निवडणुकीच्या वेळी महायुतीने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण का करीत नाही, असा आमचा सवाल आहे. बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या आरोग्याला काही झाले, तर आम्ही एकाही सत्ताधारी खासदार, आमदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आमदार रोहित पवार यांनी गुरूकूंज मोझरी येथे बोलताना दिला. रोहित पवार यांनी मोझरी येथे उपोषणस्थळी बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी खासदार अमर काळे हेही उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले, या सरकारजवळ मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांसाठी पैसा आहे. लॅपटॉप वाटण्यासाठी निधी आहे. रस्ते बांधताना मलिदा खाण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी या सरकारजवळ निधी नाही, हे पचनी पडणारे नाही. महाराष्ट्रातील जनतेचा स्वाभिमान विकत घेता येऊ शकतो, या भ्रमात महायुती सरकार आहे. पण, आता या फसव्या सरकारच्या भुलथापांना बळी पडता कामा नये. आता आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. शेतकरी आपल्या शेतात रक्ताचे पाणी करतो. आम्ही कुणाचे मिंधे नाहीत. सरकारला आता आमच्यासमोर झुकावे लागले. सरकारला त्याची किंमत मोजावी लागले, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
रोहित पवार म्हणाले, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना लागू करावी, अशी मागणी आम्ही विधानसभेत केली होती, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये आणण्यासाठी त्यांच्याकडे पक्षांतर योजना आहे, पण शेतकऱ्यांना भावांतर नाही. सोयाबीन उत्पादकांचे चार हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, त्याला जबाबदार कोण आहे. याचे उत्तर सरकार देत नाही. तसेच कापूस, तूर पिकाचे झाले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अत्यंत कमी किमतीत कापूस विकावा लागला. तूरीला भाव नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असताना सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा आहे. पण, कुणालाही त्याचे घेणेदेणे नाही.