अमरावती : हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे महायुतीचे सरकार नेहमी म्हणते, मग बच्चू कडू हे काही वेगळ्या लोकांसाठी आंदोलन करीत आहेत का, त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत का. तुम्ही मते मिळवण्यासाठी कर्जमाफीचे आश्वासन देता. आता सहा महिने होऊन गेलेत. आता या विषयावर चर्चा का करीत नाही, असा सवाल करीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गुरूवारी गुरूकूंज मोझरी येथे महायुती सरकारवर जोरदार टीका केली. बच्चू कडू यांची प्रकृती खालावली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा त्यांनी दिला.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गुरूवारी गुरूकूंज मोझरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची उपोषणस्थळी भेट घेतली. संभाजीराजे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही टीका केली.

संभाजीराजे म्हणाले, ते कोट घालून फिरणारे कृषीमंत्री. त्यांच्या जिभेला हाड नाहीये. मी त्यांच्याशी फोनवर बोलू शकलो, पण मी सुद्धा फोनवर बोलण्याची गरज कशासाठी. बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधला होता, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. पण, ही वेळ फोनवरून बोलण्याची नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्याची आहे. बच्चू कडू हा साधा कार्यकर्ता नाही. त्यांनी आपले आयुष्य शेतकऱ्यांसाठी झिजवले आहे. तुम्ही एकवेळ माझ्यावर शंका घेऊ शकता, पण बच्चू कडूंवर संशय घेऊ नका, असे आपले सरकारला आवाहन आहे. बच्चू कडू यांची प्रकृती खालावत चालली आहे. सरकारने लवकरात लवकर हा विषय सोडवला पाहिजे.

संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. त्यांचा वंशज म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी हे घराणे उभे आहे, हा संदेश देण्यासाठी मी गुरूकूंज मोझरी येथे आलो आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संयमी, कष्टाळू आहेत. त्यांच्यात संयमाची परीक्षा घेऊ नका. अन्यथा पंजाबसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होईल, असा इशारा त्यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाजीराजे म्हणाले, बच्चू कडू यांची आंदोलक म्हणून ओळख आहे. ते कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत आले आहेत. ते वेळप्रसंगी राजकीय विषयांना कमी महत्व देतील, पण शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांच्या समस्या दूर करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्यासमवेत अनेक जण उपोषण करीत आहेत. बच्चू कडूंसह सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.