अमरावती : पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी अत्यावश्यक मानला जाणारा अचलपूर- मुर्तिजापूर-दारव्हा (यवतमाळ) शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात ५० टक्के आर्थिक सहभागाची घोषणा राज्य शासनाने केली होती. १२० वर्षांचा इतिहास असलेल्या शकुंतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर विदर्भातील आर्थिक प्रगतीला चालना देऊ शकते. २०१७ मध्ये ‘कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम’ अंतर्गत राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक सहभागाची तयारी दर्शवली होती. मात्र प्रकल्प अजूनही मंजूर झालेला नाही.

मालकीहक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प रखडला आहे. प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अद्यापही प्रलंबित आहे. दोन महिन्यांपुर्वी नागपूर येथे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींची बैठक झाली, त्यातसुद्धा ब्रॉडगेजच्या ‘डीपीआर’वर चर्चा झाली. या प्रकल्पाला गती देण्यासाठी शकुंतला रेल्वे विकास समितीने मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची विनंती केली आहे.

शकुंतला रेल्वेमार्ग हा खासगी कंपनीच्या मालकीचा असल्याने रेल्वे मंत्रालयाने तो ताब्यात घेऊन ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित करणे आवश्यक आहे. २०१७ च्या पिंक बुकनुसार, गेज परिवर्तन प्रकल्पासाठी ‘कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम’ जाहीर करण्यात आला होता. याशिवाय, फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य शासनाने ५० टक्के आर्थिक सहभागाची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. परंतु, मालकीहक्काशी संबंधित अडचणी आणि काही ठिकाणी भूसंपादनाची गरज यामुळे प्रकल्प रखडला आहे. अनेक दशकांपासून शकुंतलेच्या समस्येवर तोडगा निघाला नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबई मार्गे मँचेस्टरकडे नेण्याच्या मूळ उद्देशाने ब्रिटिशांनी हा मार्ग उभारला. पुढे या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. मध्य रेल्वेने प्रवासी रेल्वेची जबाबदारी स्वीकारली आणि मूर्तिजापूर ते अचलपूर या आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ मार्गावर शकुंतलेचा प्रवास सुरू होता.

हा रेल्वेमार्ग वर्धा-नांदेड प्रकल्पाला जोडणारा असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. शकुंतला रेल्वे विकास समितीने मालकीहक्काच्या समस्येचे तातडीने निराकरण करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून प्रकल्पाला गती द्यावी, अशी विनंती समितीने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात..

रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज परिवर्तनाला मंजुरी मिळण्यासाठी शकुंतला रेल्वे विकास समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे. यातील तांत्रिक अडचणी आणि भूसंपादनाचे प्रश्न तातडीने सोडवून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाने ‘ऑपरेशन शकुंतला’ हाती घ्यावे, अशी शकुंतला रेल्वे विकास समितीची मागणी आहे. – अक्षय पांडे, समन्वयक, शकुंतला रेल्वे विकास समिती.