नागपूर : एखाद्या आमदाराच्या नावाने पैसे लुबडण्याचा प्रकार हा काही नवीन नाही. परंतु नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे आमदार प्रवीण दटके यांचे नाव वापरून नोकरी लावून देतो असे सांगून तसेच विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाने एका अज्ञात इसमाकडून पैशाची लुबाडणूक करण्यात आली आहे. विविध योजनांच्या नावे नागरिकांची दिशाभूल करण्याचा आरोपीने प्रयत्न केला. दटके यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली आहे. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शहरात राबविल्या जात आहेत. काही योजनांचे नाव घेत अज्ञात आरोपीने मध्य नागपुरातील काही लोकांना संपर्क केला व त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी दटके यांना योजनांबाबत विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. हे काम आमच्या कुठल्याही परिचिताकडून झालेले नसून हा प्रकार धक्कादायक आहे. कुणीतरी जाणुनबुजून फसवणूक करत आहे. आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे. जर कुणी अशा प्रकारे योजनांच्या नावे संपर्क करायचा प्रयत्न करत असेल तर त्वरित संपर्क करावा, असे आवाहन दटके यांनी केले आहे.
दटके यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार देत सोशल मीडियावरही नागरिकांना आवाहन केलेले आहे. दटके यांचे नाव वापरून कोणी पैसे मागत असेल किंवा नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत असेल तर अशा खोट्या माहितीला बळी पडू नका, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.