लोकसत्ता टीम
चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे पक्षांचे आवाज काढणाऱ्या बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या आवाजाने प्रेरित होऊन हैद्राबाद येथील ८ वर्षीय समहित चिताजलू या मुलाने पक्षांच्या आवाजावर पुस्तक प्रकाशित केले आहे. आता तो पक्षांचे विविध आवाज काढण्याची कला देखील आत्मसात करीत आहे.
ताडोबा प्रकल्पातील मोहर्ली गेट येथे बर्डमॅन सुमेध वाघमारे यांचा रोज सकाळी सात वाजता पक्षांचे विविध आवाज काढण्याचा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमात ताडोबात पर्यटनाला येणारे भारतातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यातील हैद्राबाद येथील एक पर्यटक आपल्या ८ वर्षाच्या मुलगा समहित चिताजलू याला घेऊन ताडोबाला आले होते. सफारी झाल्या नंतर सुमेध च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सुमेध कार्यक्रम सादर करत असतांना त्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज आणि त्यांची कृती करून दाखवीत असतो. ८ वर्षाच्या मुलामध्ये हा कार्यक्रम बघितल्यानंतर पक्षांविषयी अधिक प्रेम आपुलकी निर्माण झाली. तेथून पुढे त्या मुलाने नियमित पक्षी निरीक्षण करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा… बुलढाणा: मलकापूर शहरातील ‘मातोश्री जिनिंग’ ला आग; शेकडो क्विंटल कापूस जळाला
हैद्राबाद येथे परतल्यानंतर त्याने बर्डस ऑफ बोटेनिकल गार्डन हैद्राबाद या ठिकाणी पक्षांची नोंद केली आणि त्या वर आधारित एक पुस्तक प्रकाशित केले. छोट्या मुलांना नेहमी प्रोत्साहन देण्यात यावे, असे आवाहन त्याने केले आहे. यातुन खुप मोठी प्रेरणा मिळेल आणि पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल देण्यापेक्षा पक्षी निरीक्षणसाठी दुर्बीण आणि पक्षांचे छोटे पुस्तक व निसर्ग शिक्षण द्यावे असेही त्याचे मत आहे.